June 18, 2026
IMG-20260617-WA0005

 

संपादकीय… (  ✍🏻 शाहुदादा फरतडे ९०११३९६०११)

 ●श्रीमंतीचा भस्मासुर आणि आयुष्याचा शॉर्टकट●

बार्शी तालुक्यात घडलेली घटना वाचली आणि शब्द थिजले.शेअर मार्केटच्या नादात १कोटी ८० लाखाचे कर्ज झालेल्या मुख्याध्यापक असलेल्य शिक्षकांने एका क्षणाच्या टोकाच्या निर्णयाने आइस्क्रीममधून विष देऊन दोन चिमुकली मुलं व व पत्नी असं संपूर्ण कुटुंब संपवलंय. ही फक्त एक “हत्या-आत्महत्या” म्हणून फाईल बंद करण्याची बातमी नाही . हा आपल्या संपूर्ण पिढीला लागलेल्या “शॉर्टकट” नावाच्या महामारीवरचा आरसा आहे.

कालपर्यंत माणूस शेतात राबून, दुकानात बसून, नोकरी करून पोट भरायचा. वेळ लागायचा, पण झोप शांत लागायची. आज त्या माणसाला ‘शेअर मार्केटचा टीप्स वाला सांगतो – रोजचे ५ हजार नक्की”. ‘क्रिप्टोचा गुरु’ सांगतो – “हा कॉईन घे, महिन्यात डबल”. ‘इन्शुरन्स वाला’ सांगतो – “हा प्लॅन घे, म्हातारपण सेट”. आणि आपण? आपण त्या गोड बोलण्याला भुलतो. त्या आइस्क्रीमसारखं ते गोड लागतं. “काय फरक पडतो, एकदा ट्राय करून बघू” म्हणत आपण आपल्या कष्टाचा पैसा त्या ‘शॉर्टकट’च्या घशात ओततो. परिणाम काय? बार्शीसारखाच. कधी पैसा बुडतो, कधी घर मोडतं, कधी माणूस डोक्यात गोळी घालतो

सगळ्यात धोक्याचं लक्षण हे आहे की आज लाखाची पगार असलेला शिक्षकही फसतोय, इंजिनियर फसतोय, डॉक्टर फसतोय. पूर्वी फसवणूक फक्त अडाणी माणसाची व्हायची. आज शिकलेला माणूसही “माझा पगार कमी पडतोय, मी हुशार आहे, मला लवकर श्रीमंत व्हायचंय” या नादात फसतोय. म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या डोक्यात ‘श्रीमंतीचा भस्मासुर’ शिरलाय. आणि तो आपलंच डोकं खातोय. डिग्री आहे, पण ‘धीर’ नावाचा विषय कुणी शिकवला नाही. कारण फसवणारा हुशार नाही… आपणच घाईत आहोत.

आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला. देवाने हात-पाय, डोळे, मेंदू, धडधाकट शरीर दिलं ते कष्ट करून कमवण्यासाठी. वाडवडिलांनी रक्ताचं पाणी करून थोडीशी जमीन, एखादं घर, एक नाव आपल्या हाती दिलं. त्यांचं स्वप्न होतं – “माझा पोरगा हे सगळं जपेल, वाढवेल”. पण आज आपण काय करतोय? ती वडिलांच्या घामाची संपत्ती, ती दोन गुंठे जागा… ती शेअर मार्केटच्या ‘टिप’ मध्ये, ‘डबल होणाऱ्या’ स्कीममध्ये उडवून देतोय. राखण करायची सोडून, राख करून टाकतोय. वडिलांनी घामाने कमावलेलं, आपण मोबाईलच्या एका क्लिकवर गमावतोय.

पैसा बुडाला, कर्ज झालं की माणसाच्या डोक्यात विचार येतो: “मीच संपलो पाहिजे”. तुझा निर्णय तुझा आहे मित्रा पण त्यानंतर येणारा विचार – “माझ्याबरोबर बायको-पोरं पण घेऊन जातो”… हा विचार म्हणजे माणूसपण संपल्याची पावती आहे, अरे बाबांनो जन्मताच आई गेलेलं पोरगं पण मोठं होतं,रस्त्यावर फेकलेलं बाळ पण कधी कधी कलेक्टर होतं. रस्त्यावरचं कुत्रं पण उपाशी राहून जगतं. मग तुझी मुलं? त्यांना हात-पाय आहेत, मेंदू आहे, श्वास आहे. तू नसला तरी ही दुनिया त्यांना जगवेल. सरकार आहे, शाळा आहे, शेजारी आहे, देवदूत बनणारे लोक आहेत, पण तू त्या कोवळ्या, निष्पाप जीवांना का मारतोयस? त्यांचा काय गुन्हा? त्यांनी तुझ्यासोबत कर्ज घेतलं होतं का? त्यांनी शेअर मार्केटची टिप मागितली होती का?

तू जगण्यालायक नाहीस असं तुला वाटत असेल, तर तू एकटा जा. पण बायको-मुलांना नको मारूस. त्यांचं जगणं हिसकावण्याचा अधिकार तुला कुणी दिला? लक्षात ठेवा ज्या गोष्टीला वेळ लागत नाही, तिला किंमतही नसते. झाड लावल्यावर लगेच फळं मिळत नाहीत. कष्ट केल्याशिवाय घामाला किंमत येत नाही. आणि शॉर्टकटने मिळवलेला पैसा… तो कधीच आपला होत नाही. तो एकतर व्याजासकट परत जातो, किंवा आपल्यालाच घेऊन जातो.म्हणून आहे ती संपत्ती टिकवा,चिकाटी, बचत, काटकसर करून त्यात वाढ करा.नशिबा पेक्षा कष्टावर विश्वास ठेवा.

आपलं हसतं खेळतं कुटुंब या पुढे करोडोंची संपत्ती फिकी आहे.हळूहळू वाढणारा पैसा, हळूहळू बांधलेलं घर, हळूहळू शिकलेली मुलं… यात ग्लॅमर नाही. पण यात झोप आहे. यात समाधान आहे. यात कुटुंब आहे.ते जपा. ज्या झाडाला खत घालून, पाणी घालून वर्षांनी फळं येतात, त्याची चव वेगळी असते. आणि इंजेक्शन मारून पिकवलेल्या फळाला विष असतं. आजचा ‘शॉर्टकट’ हेच इंजेक्शन आहे.

राजकारण, व्यवसाय, अभिनय, शिक्षण या सर्व क्षेत्रात कष्ट करून नाव व पैसा कमवण्या पेक्षा शॉर्टकट च्या माध्यमातून पुढे जाण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मग सवंग प्रसिद्धी व यशस्वी होण्यासठी साठी बिभत्स अंगप्रदर्शन ,पैसे देऊन पेपर लिक, पक्षांतरे , फसवा फसवी असले प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत व यातील शेवट नरकदायक आहे .

बार्शीने आपल्याला शेवटचा इशारा दिलाय. मोबाईल बंद करा आणि आरशासमोर उभं राहून स्वतःला विचार – “मला खरंच शॉर्टकट हवाय का? की माझ्या मुलांसाठी उद्याचं उज्ज्वल आयुष्य हवंय?”पैसा गेला तर परत कमवता येतो… पण एकदा आयुष्य गेलं, एकदा कुटुंब तुटलं की परत येत नाही. तेव्हा जरा जपून चला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *