September 8, 2026
IMG-20260908-WA0008

करमाळा_चौफेर

करमाळा तालुक्यातील राजुरी व परिसरातील दारूबंदी साठी पोलीसांकडे तक्रार करून देखील कोणतीच कारवाई न झाल्याने हताश झालेल्या राजुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अजय साखरे यांनी थेट मुंबई येथे जाऊन राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.या तक्रार अर्जात साखरे यांनी म्हटले आहे की, बनावट हातभट्टी दारातून विषबाधा होण्याच्या घटना वाढत आहेत या अनुषंगाने राजुरी व परिसरातील अशा दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त करून कारवाई करावी या बाबत अनेक वेळा तक्रार अर्ज दिले तरी कारवाई होत नाही. विशेष म्हणजे दिनांक २४/०८/२०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत “गावामध्ये दारूबंदी करण्यात यावी” या विषयावर चर्चा होऊन दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. मात्र या ठरावाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.यासंदर्भात राजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते अजय अर्जुन साखरे (रा. राजुरी, ता. करमाळा) यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील मा. आयुक्त साहेबांकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनासोबत ग्रामसभा ठरावाची प्रत देखील जोडण्यात आली आहे.राजुरी गावामध्ये दारूच्या व्यसनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर, कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर तसेच सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. असा उल्लेख त्यांनी अर्जात केला आहे. तसेच,  व्यसनाधीनतेमुळे यापूर्वी गावातील काही व्यक्तींचे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे हा विषय केवळ दारूविक्रीपुरता मर्यादित नसून ग्रामस्थांचे आरोग्य, महिलांची सुरक्षितता, युवकांचे भविष्य, कुटुंबव्यवस्था आणि गावातील कायदा-सुव्यवस्था यांच्याशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात , २४/०८/२०२६ रोजी राजुरी ग्रामसभेने सर्वानुमते मंजूर केलेल्या दारूबंदी ठरावाची तातडीने दखल घेऊन नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी,व जिल्हाधिकारी, सोलापूर व राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांना आवश्यक निर्देश देण्यात यावेत,राजुरी व लगतच्या गावांमध्ये अवैध दारू, हातभट्टी व अमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात यावी. अशा महत्वपूर्ण मागण्या निवेदनात केल्या आहेत. दरम्यान, या निवेदनाची आवक प्रत दिनांक ०७/०९/२०२६ रोजी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयात जमा झाली आहे. या पत्रा नंतर तरी या अवैध दारू निर्मिती व विक्री वर पायबंद बसणार का या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *