September 13, 2026
IMG-20260913-WA0026

करमाळा_चौफेर

शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ पशुधन म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्याचे स्थान दिले जाते. वर्षभर खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून बैलपोळा साजरा केला जातो. याच परंपरेचा जागर करमाळा शहरातील सावंत परिवाराने सुमारे शंभर वर्षांपासून जपला असून यंदाही २१ बैलजोड्या व गोमातांची वाजतगाजत मिरवणूक, पारंपरिक पूजन व ‘बैलांचे लग्न’ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.सावंत परिवाराच्या सार्वजनिक बैलपोळ्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्व. अनंतराव आबा सावंत यांनी या सार्वजनिक बैलपोळ्याची सुरुवात केली. त्यानंतर स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत व त्यांच्या बंधूंनी ही परंपरा पुढे नेली. त्यानंतर विठ्ठल ( आप्पा ) सावंत यांनी ही परंपरा पुढे नेली. विठ्ठल ( आप्पा ) सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हमाल पंचायत अध्यक्ष व संचालक आदिनाथ कारखाना ॲड. राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत व नगरसेवक सुनील सावंत  यांनी या परंपरेत सातत्य ठेवले. सध्या पै. किरण सावंत यांच्या पुढाकारातून हा पारंपरिक उत्सव पुढे नेला जात आहे.बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांची खांदे मळणी करण्याची पारंपरिक प्रथा पार पडली. गुरुवारी (१० सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास सावंत परिवाराच्या वतीने बैलजोड्या आणि गोमातांची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीमुळे करमाळा शहरातील वातावरणात उत्साह निर्माण झाला. मिरवणुकीनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास सावंत गल्ली येथील निवासस्थाना समोर बैलजोड्यांचे विधिवत पूजन, हळद-कुंकू, फुले, हार आणि नैवेद्य दाखवून करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने ‘बैलांचे लग्न’ लावण्याचा सोहळा पार पडला.

●कृषी उत्पन्न बाजार समिती व हमाल बांधवांची उपस्थिती●

या सार्वजनिक बैलपोळा सोहळ्यात सावंत परिवारासह करमाळा शहर व परिसरातील शेतकरी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-तोलार तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे हा उत्सव सर्वसमावेशक स्वरूपाचा ठरला.

“सध्या ट्रॅक्टर व अवजारांचे युग, तरी बैलांचे महत्त्व कायम” 

एकीकडे शेतीमध्ये ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि अन्य आधुनिक यंत्रांचा वापर वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक बैलजोड्यांचा शेतीतील वापर कमी होत चालला आहे. मात्र, ग्रामीण संस्कृतीमध्ये बैलांचे स्थान आजही महत्त्वाचे आहे. शेतकऱ्याच्या कष्टात सहभागी होणाऱ्या या मुक्या जीवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना बैलपोळ्यामागे आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणी, चारा व पशुखाद्याचा प्रश्न निर्माण होत असतानाही शेतकरी आपल्या जनावरांची काळजी घेत आहे.पूजा व पारंपरिक विधीनंतर उपस्थितांसाठी पुरणपोळीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *