करमाळा_चौफेर ✍🏻
बळीराजाला शेतात जाणे सोयीचे व्हावे तसेच शेतीमालाची वाहतूक अधिक जलद व सुलभ व्हावी, यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजने ‘ अंतर्गत करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी 2.कोटी50 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बळीराजा पाणंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष दिग्विजय बागल यांनी ही माहिती दिली.
ग्रामीण भागात शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या रस्त्यांची मोठी अडचण भासत असते. पावसाळ्यात चिखल आणि खडतर रस्त्यांमुळे शेतीमालाची वाहतूक करणे, तसेच खते, बी-बियाणे व अन्य साहित्य शेतात नेणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कष्टाचे ठरत होते. शेतकरी बांधवांची ही अडचण ओळखून दिग्विजय बागल यांनी करमाळा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत शासनाने 2, कोटी 50लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे पाणंद रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण होऊन बळीराजाच्या दैनंदिन कष्टांची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. शेतीमाल थेट बाजारपेठेपर्यंत वेगाने पोहोचवणे शक्य होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अडीच कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे दिग्विजय बागल यांनी आभार मानले. निधी मंजूर झाल्यामुळे लवकरच पाणंद रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, दिग्विजय बागल यांच्या या प्रयत्नांबद्दल करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
करमाळा मतदारसंघातील ज्या शेतकरी बांधवांना पाणंद रस्त्याची गरज आहे, त्यांनी तातडीने संपर्क साधावा. आपल्या गावातील व शेतशिवारातील आवश्यक पाणंद रस्त्यांची माहिती द्यावी.लवकरच पाणंद रस्ते योजना समितीची बैठक आयोजित करण्यात येणार असून, याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी तसेच शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी चांगला रस्ता मिळावा, यासाठी आवश्यक पाणंद रस्त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याची आवश्यकता आहे, त्यांनी आपल्या गावातील व शेतशिवारातील रस्त्याची माहिती वेळेत द्यावी, जेणेकरून संबंधित कामाचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी घेता येईल.
श्री. दिग्विजय बागल (सहअध्यक्ष, बळीराजा पाणंद रस्ता समिती)
