करमाळा_चौफेर
पुणे येथील मेडीरिल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सामाजिक दायित्व निधी (CSR) अंतर्गत उमरड (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
कंपनीचे सर्वेसर्वा आदरणीय श्री. अनूप रिंगणगावकर सर व श्री. अपूर्व रिंगणगावकर यांच्या मार्गदर्शनातून आणि कंपनीचे मॅनेजमेंट प्रमुख श्री. गणेश पाखरे यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत शाळेला अत्याधुनिक प्रिंटर, ४३ इंची एलईडी टीव्ही आणि तीन ग्रीन बोर्ड देण्यात आले. या साहित्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल व दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, शाळेच्या प्रशासकीय कामकाजालाही गती मिळणार आहे.
शैक्षणिक साहित्य प्रदान सोहळा नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमरड येथे पार पडला. यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उमरड गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गणेश पाखरे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ज्या शाळेत माझ्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात झाली, त्या शाळेसाठी काहीतरी योगदान देता आले, ही माझ्यासाठी समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे.”पुढे ते म्हणाले, “या उपक्रमासाठी सर्वप्रथम मी मेडीरिल सिस्टीम कंपनीचे मनापासून आभार मानतो. विशेषतः कंपनीचे मालक आदरणीय अनूप रिंगणगावकर सर यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. सरांनी माझ्या या भावनेला समजून घेतले आणि उमरडच्या या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याच्या माझ्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद देत मोलाचे सहकार्य केले. व्यवसाय करताना केवळ व्यावसायिक उद्दिष्टांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपण्याची जी भावना सरांनी कंपनीमध्ये रुजवली आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”
मेडीरिल सिस्टीमच्या या सामाजिक उपक्रमाचे शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत करून कंपनीचे आभार व्यक्त केले.
