करमाळा चौफेर( शंभू फरतडे)
पटसंख्येअभावी बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी मांगी गावचे ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सुजित उर्फ तात्या बागल यांनी थेट खिशाला हात घातला आहे. “मांगी ZP शाळेत मुलांचे ऍडमिशन करा, मी तुमची घरपट्टी भरतो” हा अनोखा फंडा त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून राबवून गावातील शाळेला नवी संजीवनी दिली आहे.
गेल्या वर्षी सुजित बागल यांनी पंचक्रोशीतील पालकांना आवाहन केले होते की आपली मुले-मुली जिल्हा परिषद शाळेत पाठवा. या उपक्रमाला प्रतिसाद देत मांगीतील 20 पालकांनी आपल्या पाल्यांचे ऍडमिशन मांगी ZP शाळेत घेतले. दिलेल्या शब्दाप्रमाणे बागल यांनी त्या सर्व 20 पालकांची घरपट्टी स्वतः ग्रामपंचायतीत भरली.
ही परंपरा यंदाही कायम ठेवत, यावर्षी शाळेत जवळपास 18 नवीन पालकांनी मुलांचे ऍडमिशन घेतले असून, बागल हे त्या सर्व 18 पालकांची घरपट्टी स्वतः भरून देणार आहेत.याबत बोलताना सुजित तात्या बागल म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून पटसंख्येमुळे गावागावातील जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत. ही शाळा बंद होऊ नये यासाठी मी इथून पुढेही तन-मन-धनाने काम करेन. गावखेड्यातील प्रत्येक पालकाने आपल्या मुला-मुलींचे ऍडमिशन ZP शाळेतच घ्यावे, दर्जेदार व मोफत शिक्षण इथेच आहे.”
सुजित बागल गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. मागील 2-3 वर्षांपासून त्यांनी पर्यावरणपूरक वृक्षलागवडीचा धडाका लावला आहे. त्यांच्या पुढाकाराने आतापर्यंत हजारो झाडे विविध ठिकाणी लावली गेली आहेत. येणाऱ्या काळात मांगीसह परिसरात किमान 5 हजार झाडे लावून जोपासण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमावेळी मांगी ZP शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत वीर, श्रीम. वैशाली शेटे मॅडम, श्रीम. सुनिता काळे मॅडम, श्रीम. आशा देमुंडे मॅडम तसेच निखिल बागल, अण्णासाहेब बागल व ग्रामस्थ उपस्थित होते.
“ऍडमिशन”च्या बदल्यात “घरपट्टी” भरून पटसंख्या वाढवण्याचा हा प्रयोग जिल्ह्यासाठी नवा आदर्श ठरू शकतो.
