करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्यात गेल्या 2 वर्षांपासून वीज टंचाईमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. बोगस डीपींची संख्या वाढली आणि त्यामानाने सब-स्टेशनला पुरेसा लोड नसल्याने अधिकृत वीज कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी तात्काळ कारवाईची मागणी करत अन्यथा उपोषणाचा इशारा दिला आहे.
उन्हाळ्यात शासनाकडून 8 तास वीज देण्याचे नियोजन असतानाही सब-स्टेशनच्या केबल जळणे, महापारेषण केंद्रावरील लोड तसेच एल.टी. पोलवरील जम्प तुटण्याच्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांना केवळ 4 ते 5 तासच वीज मिळाली आहे तीही अपुऱ्या दाबाची आहे.
विहिरीत व नदीत पाणी असूनही, डीपी असूनही शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे जितक्या डीपी आहेत तितक्या प्रमाणात सब-स्टेशन नाहीत मग एवढ्या बोगस डीपी उभारल्याच कशा? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
कोटेशन भरून अधिकृतपणे वीज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. बोगस डीपींमुळे लोड वाढला आणि सब-स्टेशनवर ताण आल्याने व्होल्टेज ड्रॉप होत आहे. त्यामुळे अधिकृत वीज जोडणी असूनही पीक जळण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात बोलताना शंभूराजे फरतडे म्हणाले,
“तालुक्यातील बोगस डीपींवर तात्काळ कारवाई करावी. तसेच सर्वांना नियमित आणि पूर्ण दाबाने वीज मिळावी यासाठी नवीन सब-स्टेशनचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा.”
या मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्ट पासून करमाळा येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे
