July 31, 2026
IMG-20260731-WA0048

माझ्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये मी अनुभवलेला सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेला अभ्यासू,जनकल्याणाची आस असलेला, लोकांसाठी सदैव उपलब्ध असलेला सर्वसमावेशक, समन्वयवादी दृष्टिकोन ठेवून राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणारा एकमेव लोकनेता म्हणजे संजयमामा !

येईल त्या,फोन करेल त्या कुठल्याही माणसाचं काम समजून घेणं,ते लगेच मार्गी लावणं आणि होत नसेल तर का होत नाही..त्यासाठी काय करावं लागेल,कुठल्या सनदशीर मार्गाने जावं लागेल! हे त्याला समजावून सांगणं आणि कुणालाही भूलथापा न मारणं,नादी न लावणे हे आणि काम घेऊन आलेला माणूस कुठल्या गटाचा,पार्टीचा,नेत्याचा समर्थक आहे हे न पाहता त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं हे मामांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.   मितभाषी असलेल्या मामांचे मुद्देसुद आणि कामाविषयीच चर्चा करणे,उगीच शब्दांचा फाफटपसारा मांडून लोकांची शाब्दिक करमणूक करून लोकांना खोटी आश्वासने देऊन त्यांचा नी स्वतःचा वेळ निष्कारण घालवणे हेही त्यांच्या स्वभावात नाही.” वाडवडिलांची राजकीय पुण्याई ही राजकारणात पुढच्या पिढीच्या वारसांपैकी एकदाच आणि एकाच्याच वाट्याला येते आणि त्या बळावर संधी मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचे कर्तृत्वच सिद्ध करावे लागते,अन्यथा जनता तुम्हाला कायमचे नाकारते !” हे मत मामा त्यांच्या जाहीर भाषणांमधून व्यक्त करत असतात.     त्यांचे वडील स्व. विठ्ठलरावभाऊ शिंदे हे स्वकर्तृत्वाच्या बळावर माढा पंचायत समितीचे पहिले सभापती आणि १९७२ च्या निवडणुकीत माढा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडले गेले होते.दुर्दैवाने ती टर्म संपण्यापूर्वीच १९७६ मध्ये त्यांचे निधन झालं ज्यावेळी मामा अवघ्या आठनऊ वर्षांचे होते.साहजिकच त्यावेळी ज्येष्ठ बंधू असलेल्या आदरणीय बबनदादांकडे वडिलांचा राजकीय वारसा आणि घराचे कर्तेपण आले.अर्थात दादांनाही वडिलांच्या अकाली जाण्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ लगोलग मिळाला नाही.     निमगावचे सरपंच,पंचायत समितीचे सभापती,जिल्हा परिषद सदस्य,जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक,जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष अशी पदे मिळवत या पदांच्या माध्यमातून आपले कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करणाऱ्या दादांना वडील गेल्यानंतर एकोणीस वर्षांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवारी नाकारली तरी तालुक्यातील जनतेने अपक्ष आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्यानंतर तब्बल सहा टर्म जनतेने त्यांच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचं त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वातून कसं सोनं केलं हे इथं विस्ताराने सांगण्याची गरज नसावी..!         डिलांचे नाव आणि दादांचे मार्गदर्शनाखाली मामांनी स्वतःला घडविण्यास सुरुवात केली.दादा आमदार झाले त्या वेळी मामा निमगावचे सरपंच होते,त्या अर्थाने ते पद म्हणजे त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा म्हणता येईल.त्यानंतर पुढील काळात अंगीभूत असलेले नेतृत्वगुण,संघटनकौशल्य अशा गुणांमुळे मामांनी पंचायत समिती सभापती, कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चे सभापती,जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक,जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आदी पदांवर काम करत आपले नेतृत्व सिद्ध केले.ही वाटचाल सुरू असताना आवश्यक तिथं संघर्षातून पुढे जात असताना मामांनी आपली भूमिका सदैव ज्येष्ठ बंधू बबनदादा यांच्या राजकारणाशी पूरक ठेवली ही बाब महत्वपूर्ण आहे.याचं दरम्यान विठ्ठल कॉर्पोरेशन या उद्योगसमूहाची उभारणी करून त्याद्वारे साखर कारखाना,सूत गिरणी,टेक्सटाइल पार्क सुरू करून शेकडो युवकांना रोजगार मिळवून दिला,आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दाम देण्याचे कामही केले.

२०१७ च्या जिल्हापरिषद निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून येऊन सोलापूर जिल्हा परिषदेचा बिनविरोध अध्यक्ष होण्याचा विक्रम त्यांनी केला. या पदाच्या माध्यमातून मामांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण केला.त्या कार्यकाळात मामांनी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात विविध कामांसाठी विकासनिधी देऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तब्बल ६०० कोटी रुपयांची विकासकामे केली.त्यामुळं मामांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक नवा प्रबळ राजकीय गट उभा राहिला.सर्वांगीण विकास आणि सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या मामांच्या भूमिकेमुळे २०१९ च्या निवडणुकीत मतदारसंघातील जनतेने त्यांना अपक्ष आमदार म्हणून विजयी केले.     ०१९ ते २०२४ या कार्यकाळातील सुरुवातीची दोन,सव्वादोन वर्षे कोरोनामुळे व नंतर जून २०२२ मध्ये सरकार बदलल्याने आणि नंतर जुलै २०२३ मध्ये अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री होईपर्यंत या कार्यकाळातली जवळपास सव्वातीन वर्षे तशी विकासाच्या दृष्टीने व्यर्थच गेली मात्र दादा पुन्हा सत्तेत आल्यानंतर संजयमामांनी मतदारसंघासाठी जवळपास ३६०० कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक विकासकामे मंजूर करवून घेतली हे सर्वश्रुत असल्याने त्याचा तपशिलात उहापोह करण्याची गरज नसावी ! थोडक्या कालावधीत विकासकामांसाठी एवढा निधी आणणारे या तालुक्याचे,मतदारसंघाचे मामा हे पहिलेच आमदार म्हणावे लागतील.पण…लोकप्रतिनिधी या नात्याने अल्प काळात इतकी दैदिप्यमान,सर्वसमावेशक कामगिरी करूनसुद्धा मामांच्या आमदारकीचा सर्व तऱ्हेचा लाभ घेणाऱ्या काही जणांनी ऐनवेळी संधीसाधू भूमिका घेऊन, मामांचा विकास हा केवळ कागदावरचा विकास आहे…या केलेल्या अपप्रचाराला या तालुक्यातली जनता फशी पडली आणि २०२४ च्या निवडणुकीत व त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या आदिनाथच्या निवडणुकीत इथल्या मतदारांनी मामांचे नेतृत्व नाकारले ! त्याचा पश्चाताप आता तालुक्यातील जनतेला तर होतोच आहे पण ज्यांनी अपप्रचार करून जनतेची दिशाभूल केली त्यांनादेखील होतो आहे हे समाजमनातून व्यक्त होताना दिसून येते.पण ही झाली पश्चातबुद्धी ! कारण या सार्वत्रिक चुकीमुळे या तालुक्याचा होऊ घातलेला सर्वांगीण विकास पाच वर्षे खुंटला हे लक्षात घेऊन २०२९ च्या निवडणुकीत याची दामदुप्पट भरपाई करणे आवश्यक नव्हे तर अनिवार्य असणार आहे.कारण केवळ मामांच्याच सर्वार्थाने प्रगल्भ असलेल्या नेतृत्वाखाली या तालुक्याच्या,मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा अनुशेष भरून निघू शकतो इतकंच आता जनतेने लक्षात घ्यायला हवं!     मामांच्या नेतृत्वाची आणखी काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे करमाळा मतदारसंघाला आजवरच्या इतिहासात लाभलेले संजयमामा हे दुसरे पदवीधर आमदार होय.पहिले पदवीधर आमदार म्हणजे सुशीलकुमार शिंदे! दुसरे वैशिष्ट्य म्हणजे संजयमामांनी जनतेच्या,शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या सहकारी संस्था मोडीत काढून कधी स्वतःचे घर भरले नाही,स्वतःचा प्रपंच चालविला नाही अथवा दुसऱ्यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांमध्ये ढवळाढवळ केली नाही आणि कुठल्याही विकासकामांमध्ये कधी खीळ घातली नाही.

तिसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इतक्या पदांवर काम करूनदेखील आजही मामांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा ही आरशाप्रमाणे स्वच्छ तर आहेच पण अभ्यासू वृत्तीमुळे प्रशासन आणि सामान्य जनता यांचा समन्वय साधून कामे कशी मार्गी लावायची याची अचूक जाण असलेला नेता म्हणून मामांचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल.आणि चौथे वैशिष्ट्य हे की,संजयमामांनी आपल्या वैयक्तिक राजकीय स्वार्थ व संधीसाठी कधीही नेतृत्व आणि पक्षनिष्ठेला तिलांजली दिली नाही.आजच्या जमान्यात रातोरात दोन पक्ष,दोन नेते अशी निष्ठा बदलणारी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.संजयमामा हे त्याही दृष्टीने आजच्या संधीसाधू राजकारण,सत्ताकारणातील आदर्श,अनुकरणीय नेतृत्व मानावे लागेल !  ३१ जुलै हा मामांचा वाढदिवस.त्या निमित्ताने या चतुरस्थ,अष्टपैलू,सर्वसमावेशक,गुणग्राहक,विकासप्रिय,स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाला मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा !

✍🏻विवेक शं.येवले, करमाळा मो.९४२३५२८८३४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *