April 18, 2026
IMG-20260418-WA0040

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
केम येथील मल्हारी कांबळे यांच्या खुनाचा गुन्हा करमाळा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उघड करून दोघा आरोपींना अटक केली आहे. आरोपी दुसरे-तिसरे कोणी नसून मृताची सख्खी बहीण शीतल राजू केंगार व भावजी राजेश बापू केंगार हेच निघाले आहेत अशी माहिती करमाळा पोलीसांकडून मिळाली आहे दि. 12/04/2026 रोजी मौजे केम येथील दत्तात्रय तुकाराम देवकर यांचे शेती गट नं. 527 मधील विहिरीचे भरावाचे कडेला असलेल्या मकवानाच्या गंजीच्या आडोशाला मल्हारी पोपट कांबळे, वय 38 यांचे प्रेत मिळून आले होते. सुरुवातीला आकस्मात मृत्यू नं. 38/2026 अशी नोंद करण्यात आली. मृताची बहीण शीतल व भावजी राजेश यांनी मृतास दारूचे व्यसन असल्याचे सांगून कोणावरही संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले होते.पोस्टमार्टम रिपोर्टने उघड झाले बिंग

पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तपासिक अंमलदार पोपट टिळेकर व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केला.चौकशी दरम्यान पोलीसांना आला संशय खाक्या दाखवताच दिली कबुली तपासा दरम्यान पो.नि. रणजीत माने यांना शीतल व राजेश केंगार यांच्या हालचालींवर संशय आला. कसून चौकशी केली असता बहिण शीतल हिने कबुली दिली की, “भाऊ मल्हारी रोज दारू पिऊन माझ्यासोबत भांडण करायचा, ‘तुम्ही येथून निघून जा’ असे म्हणायचा. त्यामुळे मी वैतागले होते.”

दिनांक 11/04/26 रोजी भाऊ मल्हारी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला व भांडण करू लागला. राग अनावर न झाल्याने शीतलने ओढणीने भावाचा गळा आवळून जीव घेतला . त्यावेळी पती राजेश केंगार तेथे आले. त्यांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर दोघांनी मिळून प्रेत दोघांचे खांद्यावर घेऊन रानारानातून जाऊन दत्तात्रय देवकर यांचे विहिरीचे भरावाचे कडेला असलेल्या मकवानाच्या गंजीच्या आडोशाला टाकून दिले.गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी शीतल राजू केंगार, वय 32 व राजेश बापू केंगार, वय 30 दोघे रा. केम, यांना अटक केली आहे. पुढील तपास पो.नि. रणजीत माने करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रणजीत माने, सपोनि पोपट टिळेकर , श्रेणी पोसई जाधव, पोहेकॉ/अजित उबाळे, आप्पा लोहार, महेश डोंगरे, भाऊराव शेळके, पोना/मनिष पवार, वैभव ठेंगल, पोकॉ/अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदिल यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *