करमाळा_चौफेर (शंभू फरतडे) करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीजपुरवठा देण्यात यावा तसेच कुकडी-उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण तात्काळ सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली आहे.शिंदे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करमाळा तालुक्यातील शेती, सिंचन आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
●८ तास वीजपुरवठ्याची मागणी●उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना सध्या वीजपुरवठा अपुरा मिळत असल्याने शेतीला पाणी देण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या भागात सलग ८ तास वीजपुरवठा करण्याबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शिंदे यांनी मंत्र्यांकडे केली.
●कुकडी-उजनी योजनेचे सर्वेक्षण तातडीने सुरू करा●
करमाळा तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या कुकडी-उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण तातडीने सुरू करून पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशीही मागणी करण्यात आली. शिंदे म्हणाले, ही योजना मार्गी लागल्यास तालुक्यातील २४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होऊन दुष्काळी परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल.
●मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन●
या मागण्यांची दखल घेत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. 25 जुलै 2026 पासून उजनी बॅकवॉटर परिसरात वीजपुरवठा नियमित करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच कुकडी-उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणालाही तात्काळ सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती भेटीनंतर माजी आ. शिंदे यांनी दिली.
आठ तास वीज निर्णय झाल्यास करमाळा तालुक्यातील उजणी काठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.याच प्रश्नांसाठी शेतकऱ्यांनी उद्या पासून अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 
