करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दि. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तूर्त स्थगित केली आहे. याबाबतचे पत्र आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जिल्हा व तालुका स्तरावरील निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले आहे. सुधारित कार्यक्रम नंतर कळविण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
●बागल यांच्या निवेदनामुळे निर्णय●
करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष श्री. सुजित शिवाजी बागल यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार आयोगाने दिलेला 15 जुलै 2026 चा प्रारूप व अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम चुकीचा होता. या कार्यक्रमानुसार अनेक तरुण मतदार नोंदणीपासून वंचित राहणार होते. तसेच भारत निवडणूक आयोगाकडून सध्या मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण सुरू असल्याने, ते पूर्ण झाल्यानंतरच आणि नवीन मतदार नोंदणी झाल्यानंतरच यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी बागल यांनी केली होती.
●जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल●
बागल यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आयोगाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम स्थगित केला.
●राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मागणीला यश●
सुजित बागल आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला आहे. त्यामुळे तरुण मतदारांना नाव नोंदणीची संधी मिळणार असून, त्यांचे अभिनंदन होत आहे.
