करमाळा_चौफेर शंभू फरतडे ✍️
तीन शाळांमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत असताना शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण, निष्ठावान व बहुआयामी कार्य करणारे जगन्नाथ जाधव सर यांना माळी समाजसेवी संस्थेच्या वतीने “महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. “अष्टपैलू व्यक्तिमत्व” म्हणून त्यांचा हा गौरव करण्यात आला.
जाधव सर सध्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय वीट, श्री महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय मोरवड व श्री गिरधरदास देवी विद्यालय करमाळा या तीन शाळांमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, समाजप्रबोधन, सामाजिक व्याख्याने आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

हा सन्मान सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. महापौर विनायकजी कोंड्याल (सोलापूर), कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब माळी (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मोर्चा – भाजपा) तसेच मोहोळ चे नगराध्यक्ष रमेशजी बारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाधव सरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जगन्नाथ जाधव सर हे केवळ ग्रंथपाल म्हणूनच नव्हे तर शिक्षक, मार्गदर्शक, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि समाजाशी घट्ट नाते जपणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विद्यालयातील नवोपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, मूल्यशिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन, खेळाडूंसाठी योगदान या सर्व बाबींमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.

आयुष्यातील चौथा मानाचा सन्मान
हा पुरस्कार त्यांच्या आयुष्यातील चौथा मानाचा सन्मान आहे. यापूर्वी त्यांना दोन राज्यस्तरीय जीवनगौरव आणि एक जिल्हास्तरीय असे एकूण चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही गौरवशाली परंपरा त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची, निष्ठेची आणि गुणवत्तेची साक्ष देणारी आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जगन्नाथ जाधव सर यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

