August 6, 2026
IMG-20260806-WA0046

करमाळा चौफेर (शंभू फरतडे )
करमाळा तालुक्यातील उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतीपंपाच्या वायर चोरीचे सत्र सुरूच असून पारेवाडी तालुका करमाळा येथील तब्बल दहा शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची नासदूस  करून त्यामधील वायर चोरीला गेल्याची घटना काल उघडकीस आली आहे.गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने पारेवाडी लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता.त्यामुळे पारेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी या तलावावर आपले शेती पंप चालू केले होते. सध्या तलावातील पाणीसाठा कमी झाला असून तो आता संपण्याच्या मार्गावर आहे.या बिकट परिस्थितीत शेतकरी पाईप व केबलची वाढ करून पाणी उपसा करत आहेत.


याच दरम्यान तलावावरून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या राजेंद्र अंकुश जाधव, सुभाष खोटे, सतीश सुरेश खोटे, संभाजी निवृत्ती शिंदे,उद्धव सोपान देवकर, मारुती आदिनाथ जाधव, तानाजी विठ्ठल शिंदे,सुनील सोमनाथ नवले, सार्थक राजेंद्र जाधवआणि सुनील कुंडलीक घाडगे या शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वायर चोरून पंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना घडली आहे.
ही घटना परवा रात्री घडली असून काल शेतकरी वीज पंप चालू करण्यासाठी तलावा वर गेले असता त्यांच्या निदर्शनास आले.
सतत घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वाता वरून पसरले आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तलाव कोरडा टाक पडण्याच्या मार्गावर असून हे दुसरे संकट शेतकऱ्यां पुढे उभे राहिले आहे.
प्रशासनाने या बाबीचा तातडीने तपास करून या भागातील शेतीपंप चोरीचे सत्र थांबवावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.उजनी बॅक वॉटर परिसरातून आता चोरांनी आपला मोर्चा तलावातील शेती पंपाकडे वळवला असून सात महिन्यापूर्वी केत्तूर परिसरातील पाच ते सहा शेतीपंपाच्या वायरची चोरी झाली होती. त्याचा तपास होणे अजून बाकी असतानाच आता तशाच प्रकारची घटना पारेवाडी लघुपाट बंधारे तलावाच्या परिसरात उघडकीस आली आहे.पोलीस प्रशासनाने या गोष्टीचा गंभीरपणे तपास करून या भागातील शेतीपंपाच्या वायर चोरीचे सत्र थांबवावे व आरोपींना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा.अशी मागणी शेतकरी रवींद्र रामहरी नवले यांनी केली आहे या प्रकारणाचा छडा लागणार का ? या कडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *