आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात करमाळा तालूक्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक सविस्तरपणे माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांचा करमाळा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सततचा पाठपुरावा चालू असुन पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सुध्दा काही महत्त्वाचे प्रश्न आमदार नारायण आबा पाटील सभागृहात मांडणार आहेत.
सध्या करमाळा तालूक्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात करमाळा तालूक्याचा समावेश करुन घेण्यात आमदार नारायण आबा पाटील यांना यश आले आहे. नीती आयोगाने देशातील सर्वात दुर्लक्षित व मागासलेल्या ११२ जिल्ह्यांचा झपाट्याने कायापालट करण्यासाठी सन २०१८ पासून आकांक्षित जिल्हा कार्यक्रम हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार केंद्र व राज्य सरकार यांच्या निरिक्षणातुन काही जिल्हे निवडले गेले. सदर कार्यक्रमांतर्गत संबंधित जिल्ह्यातील विकासापासून वंचित राहिलेल्या तालूक्यांची निवड केली जाते. यामुळे सोलापूर जिल्ह्याचा या कार्यक्रमात समावेश केला गेला असे समजताच आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्याचा समावेश करावा अशी आग्रही मागणी केली.
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, अक्कलकोट व सांगोला या तीनच तालूक्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता त्यानुसार करमाळा तालुक्याचे १) आरोग्य व पोषण २) शिक्षण ३) कृषी व संलग्न सेवा ४) मुलभूत पायाभूत सुविधा ५) सामाजिक विकास या क्षेत्रातील ४० प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन नीती आयोगाकडून करमाळा तालूक्यास विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील आरोग्य व शिक्षण या सुविधा अधिक बळकट होतील.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम राबवला जात असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील २७ तालूक्याची यासाठी निवड करण्यात आली आहे. यात करमाळा तालुक्याचा समावेश करुन घेण्यात आमदार नारायण आबा पाटील यांना यश आल्याने विकासाचा आणखी एक पर्याय खुला झाल्याचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.
तसेच आमदार नारायण आबा पाटील हे सतत मतदार संघातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करत असतात त्याचेच हे फलित असुन मागील पाच वर्षात तालूका व पर्यायाने मतदार संघ विकासापासून दुर गेल्याने परत एकदा करमाळा तालूक्यास विकासाच्या वाटेवर आणण्याचे काम आमदार नारायण आबा पाटील करत असल्याचे तळेकर यांनी सांगितले.
