करमाळा_चौफेर (शंभू फरतडे )
करमाळा बसस्थानक परिसरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर आता पोलिसांचा दंडुका उगारला जाणार आहे. बसस्थानकाच्या 200 मीटर नो-पार्किंग झोनमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत आगार व्यवस्थापक, करमाळा यांनी पोलीस निरीक्षक, करमाळाआ यांना अधिकृत पत्र दिले आहे.
विभाग नियंत्रक, सोलापूर यांच्या आदेशानुसार व मुंबई येथील मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांच्या बैठकीतील निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. दि. 05.06.2026 ते दि. 14.06.2026 या कालावधीत विशेष मोहिमेद्वारे कारवाई करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत.
आगार व्यवस्थापकांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, बसस्थानकापासून 200 मीटर नो-पार्किंग झोनमध्ये काही खाजगी वाहने थांबून प्रवाशांची अवैधरित्या चढ-उतार व वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या महसुलावर विपरीत परिणाम होत असून बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी व सुरक्षेची समस्या निर्माण होत आहे.
“करमाळा बसस्थानक परिसरातील 200 मीटर नो-पार्किंग झोनमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहने, टेम्पो, जीप, वडाप व इतर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी” अशी मागणी आगार व्यवस्थापकांनी केली आहे.
आगार व्यवस्थापक व पोलीस-प्रशासन यांच्या संयुक्त मोहिम अंतर्गत उद्या पासून या कारवाईस सुरुवात होणार आहे.
