करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी रावगाव ता.करमाळा येथील एका कार्यक्रमात लव्हे येथील ३३/११ केव्हीए सबस्टेशन हे पुर्वी पोमलवाडी ता.करमाळा या ठिकाणासाठी मंजूर झाले होते परंतू विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी सन २०१८ मध्ये सदर सबस्टेशन हे लव्हे ता.करमाळा येथे प्रस्तावित केले असे विधान केले.
याबाबत आज आमदार नारायण आबा पाटील गटाकडून माजी आमदार संजयमामा शिंदे हे खोटी माहिती जनतेसमोर मांडत असल्याचे सांगून यामागची सत्यता सांगण्यात आली. यावेळी अधिक सविस्तर माहिती देताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की मुळात सन २०१४ ते २०१९ मध्ये आमदार नारायण आबा पाटील यांनी वीजे संदर्भात भरीव अशी कामे करुन पायाभूत सुविधांचा अभाव भरुन काढला आहे. यावेळी ज्या लव्हे येथील ३३/११ केव्हीए क्षमतेच्या उपवीज केंद्राबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे हे जनतेत चुकीची माहिती देत आहेत ते सबस्टेशन शेलगाव (वांगी) या ठिकाणी प्रस्तावित होते. पोमलवाडी या ठिकाणी कोणतेही सबस्टेशन प्रस्तावित नव्हते. यामुळे महावितरण कडुन शेलगाव (वांगी) येथे जागा पाहणी करण्यात आली. परंतू शेलगाव (वांगी) येथे ओढा असलेल्या ठिकाणीच जागा उपलब्ध आहे असे पाहणीत आढळुन आले. परंतू पावसाळ्यात या ठिकाणी पाणी येऊन प्रस्तावित सबस्टेशनसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता महावितरण कडून व्यक्त करण्यात आली व नंतर शेलगाव येथे जागे अभावी हे सबस्टेशन उभारले जाऊ शकले नाही. यामुळे आमदार नारायण आबा पाटील यांनी शेलगाव व लव्हे यांच्या अगदी मध्यावर म्हणजेच शीवेवर असलेल्या ठिकाणी स्वतः जागा उपलब्ध करुन दिली व सदर ठिकाणी हे ३३/११ केव्हीए क्षमतेच्या सबस्टेशनची उभारणी झाली.
यानंतर आजही या सबस्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर वरील फिडर वरुन शेलगाव वांगी व पांगरे या ठिकाणी वीज पुरवठा दिला जात असल्याने शेलगाव येथील वीज समस्या सुटली गेली. ही खरी वस्तुस्थिती असुन माजी आमदार संजयमामा शिंदे हे धादांत खोटी माहिती जनतेसमोर मांडुन भ्रम पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मुळात माजी आमदार संजयमामा शिंदे यांना त्यांच्या कालावधीत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी किती वीज मिळत आहे हे सुध्दा ठाउक नव्हते.
कोळगाव परिसरात चार तास शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरु असताना तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःच्या पत्रावर महावितरण अधिक्षक अभियंता सोलापूर यांचेकडे कोळगाव परिसरात किमान दोन तास तरी वीजपुरवठा करावा अशी मागणी केली होती. त्यांच्या या अज्ञानीपणामुळे त्यावेळी कोळगाव परिसरातील शेतीपंपाची वीज चार तासावरुन दोन तास करण्यात आली. इतके महान प्रताप त्यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी करुन दाखवले आहेत अशी टिका तळेकर यांनी केली आहे. यामुळे आता महावितरण कडे लव्हे येथील सबस्टेशनसाठीची मागणी व कार्यवाही याची लेखी माहिती उपलब्ध आहे. यात पोमलवाडीचा एकदाही उल्लेख नाही. यामुळे माजी आमदार संजयमामा शिंदे यांना त्यांच्या कालावधीत कामे करता आली नाहीत पण किमान आमदार नारायण आबा पाटील यांनी केलेल्या कामाची चुकीची माहिती तरी त्यांनी जनतेसमोर मांडुन स्वतःचे हसु करुन घेतले आहे. यामुळे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे अज्ञान हे करमाळा तालुक्यातील जनतेसमोर उघडे पडले असुन सन २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत सतरा हजार मतांनी पराभूत का झाले याचे हे एक कारण असल्याच घणाघाती प्रहार पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला.
