करमाळा_चौफेर शंभू फरतडे
करमाळा तालुक्यातील सीना नदी परिसरातील पाणी ओसरताच वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. परांडा व करमाळा तालुक्यातील काही वाळू चोरांनी सीना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू केल्याची चर्चा सुरू असतानाच महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. बिटरगाव श्री येथे पहाटेच्या सुमारास धाड टाकत महसूल विभागाच्या पथकाने १ ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त केला असून संबंधितांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. १५ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मागील पुरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू नदीपात्रात वाहून आल्याने सीना नदीत मुबलक वाळू साठा दिसून येत आहे. त्यामुळे वाळू माफियांची चांगलीच चांदी होत असल्याचे बोलले जात आहे.
सीना नदीतील ज्या भागातील पाणी ओसरले आहे त्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार करमाळा व परांडा तालुक्याच्या सीमेवरील भागात महसूल विभागाचे पथक सतर्क झाले होते.
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या पथकातील पोथरे गावचे तलाठी हर्षल शेंगळे, पोटेगावचे तलाठी विवेक चिंतामणी, बिटरगावचे तलाठी आदित्य मस्तुद तसेच बिटरगावचे पोलीस पाटील शोभा अभिमन्यू यांनी रात्री गस्त घालत असताना बिटरगाव श्री येथील जिल्हा परिषद शाळेसमोरून दोन चाकी ट्रेलरसह एक ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना पकडला.
या कारवाईत ट्रॅक्टर चालक दादासाहेब मुरूमकर यांचा समावेश असून इतर संबंधितांचीही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये तब्बल १ ब्रास वाळू आढळून आली आहे.
या प्रकरणी संबंधितांविरोधात गौण खनिज नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एफआयआरमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तसेच गौण खनिज नियमांनुसार कारवाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. अवैध वाळू उपसा, वाहतूक व शासनाच्या महसुलाला फटका बसवल्याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
स्थानिकांमध्येही या कारवाईची मोठी चर्चा सुरू असून महसूल विभागाने वाळू माफियांवर कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. अवैध वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडत असून घरकुल योजनेसाठी उपलब्ध होणाऱ्या वाळूचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
“अशा प्रकारच्या वाळू चोरीवर पुढेही कडक कारवाई सुरू राहणार आहे. आमचे पथक कायम देखरेख ठेवून आहे. नागरिकांनीही माहिती देऊन सहकार्य करावे. शासनाकडून मिळणारी वाळू ही घरकुलांसाठी देण्याचे नियोजन आहे. वाळू चोरीमुळे सर्वसामान्य घरकुलधारकांचे नुकसान होऊ शकते.”
— आदित्य मस्तुद, तलाठी, बिटरगाव श्री
