May 24, 2026
IMG-20260524-WA0019

करमाळा_चौफेर

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्य बाजार आवारातील प्रमुख रस्त्यांची कॉंक्रिटीकरणाची कामे कोणत्याही वित्तीय संस्था अथवा बँकेचे कर्ज न घेता स्वनिधीतूनच पूर्ण केली असून, आता उर्वरित अंतर्गत रस्त्यांची कॉंक्रिटीकरणाची कामे देखील लवकरच हाती घेण्यात येणार आहेत आणि ती सुद्धा स्वनिधीतूनच केली जाणार आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली.अधिक माहिती देताना जयवंतराव जगताप म्हणाले की “देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांनी करमाळा तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतःची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने १९४८ साली बाजार समितीची स्थापना केली.” तद्नंतर त्यांनी करमाळा व जेऊर येथे जागा खरेदी व संपादित करून बाजार समितीत पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचा थेट परिणाम शेतकरी, व्यापारी, हमाल-तोलार व अन्य घटकांच्या प्रापंचिक उन्नती व आर्थिक सुधारणेत झाला. आर्थिक उलाढालीमुळे करमाळा शहर व बाजारपेठ सर्वांगाने फुलू लागली.“मी १९८९ साली बाजार समितीची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोयी सुविधा व त्यासाठी उत्पन्न वाढीची गरज लक्षात घेऊन नगररोड व जामखेड रोड वॉल कंपाऊंड लगत शॉपिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला,” असे जगताप यांनी सांगितले. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली व शेकडो सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. शॉपिंग सेंटर बरोबरच सेल हॉल, गोदामे, रयत भवन, कार्यालयीन इमारत, शेतकरी निवास, धान्य चाळणी यंत्र, भाजी मंडई व कॅटल मार्केटची उभारणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहारांच्या सुलभतेसाठी डीसीसी बँकेची शाखा मार्केट यार्ड येथे काढण्यात आली. रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या.करमाळा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव, विक्री केलेल्या शेतमालाचे २४ तासाच्या आत पट्टी तसेच पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी, हमाल-तोलार आदी घटकांमध्ये असलेला अंतर्गत समन्वय यामुळे शेतकरी व खरेदीदारांचा करमाळा मार्केटवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच करमाळा तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतमाल मोठ्या प्रमाणावर करमाळा येथे विक्रीस येतो व करमाळा बाजारपेठेचा विश्वसनीय बाजारपेठ असा नावलौकिक झाला असल्याचे सभापतींनी सांगतीले. तसे “करमाळा बाजार समिती सातत्याने वाढाव्यात राहणारी बाजार समिती असून कर्ज न काढता स्वनिधीतूनच विकास कामे करण्यावरच आमचे कटाक्षाने लक्ष असते,” असे जगताप यांनी स्पष्ट केले. गतवर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली तरी देखील पारदर्शी व काटकसरी कामकाजामुळे बाजार समिती वाढाव्यात आहे  ,आगामी काळात उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित करून त्यातून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्याचा व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचा संचालक या नात्याने संघाच्या संचालक मंडळाच्या शिष्टमंडळासह पणनमंत्री ना. जयकुमार रावल यांची भेट घेऊन ‘भावांतर भुगतान योजना’ लागू करण्याची मागणी करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्री केला आहे परंतु हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री झाला असेल तर शासनाने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर भावांतर भुगतान योजना लागू करावी अशी मागणी देखील जयवंतराव जगताप यांनी केली असुन हि मागणी मंजूर झाल्यानंतर हमीभाव दर व मार्केटमधील दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करून देता येते. मध्यप्रदेश सरकारने करून या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता,” 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *