करमाळा_चौफेर
सध्या उजनी धरणामध्ये 52 टक्के पाणीसाठा झाला आहे. उजनी वरील पुणे जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील धरणे ही जवळपास 70 टक्के च्या आसपास भरलेली आहेत. मात्र करमाळा तालुक्यात अद्याप पर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने येथे भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उजनी धरणातून तातडीने दहिगाव उपसा सिंचन प्रकल्पासाठी व भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडावे आणि उजनी काठावरील शेतकऱ्यांसाठी पूर्ववत आठ तास वीज देण्याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन माननीय दिग्विजय बागल यांनी आज केली.
या बाबत दिग्विजय बागल यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधकारी यांना रितसर निवेदन पाठवले असून पालक मंत्री यांना फोनवरून देखील संपर्क साधला आहे
याबाबत सविस्तर माहिती देताना श्री. बागल म्हणाले की, यावर्षी जून महिना संपून गेला व जुलै निम्मा संपलेला असून करमाळा तालुक्यात अद्याप पर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. करमाळा तालुक्यातील अनेक मध्यम प्रकल्प, तलाव कोरडे पडले आहेत. तीव्र टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांचे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.परंतु पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडलेल्या पावसामुळे उजनी धरण सध्या 52 टक्के भरले असून समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे उजनी काठावरील शेतकऱ्यांसाठी पूर्ववत आठ तास वीज पुरवठा करण्यात यावा.तसेच करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता तालुक्यासाठी महत्त्वाच्या दहिगाव उपसा सिंचन प्रकल्पातून व भीमा-सीना जोडकालव्यातून तातडीने उजनी धरणाचे पाणी सोडण्यात यावे.
सध्या करमाळा तालुक्यातील जनावरांचे व माणसांचे पिण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. तुटपुंजा पावसावर शेतकऱ्यांनी जी पेरणी केली त्यांची उगवणही नीट झालेली नाही. त्यामुळे यावर्षी भीषण दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. प्रशासनाने या मागणीचा तातडीने विचार करून उजनी धरणातून पाणी सोडून उजनीकाठावरील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत आठ तास करावा, अशी मागणी श्री दिग्विजय बागल यांनी यावेळी केली.
