करमाळा_चौफेर ( शंभू फरतडे✍)
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीत पुन्हा एकदा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने शिंदेसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, शिंदेसेनेचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी मात्र निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला असल्याने महायुतीतील समीकरणे अधिकच चर्चेत आली आहेत.
चिवटे यांना शिक्षकांचा वाढता पाठिंबा भेटल्यावर शिंदेसेनेतून सानप यांना पुढे करून बंडाळी भासवण्यात आली या मागे देखील भाजप ची छुपी रणनीती असल्याचे बोलले जात आहे. बंडाळीचा थेट तोटा चिवटे यांना झाल्याचे दिसत असले तरी पुणे शिक्षक मतदार संघातील अनेक मातब्बर राजकीय नेते,शिक्षक नेते यांचा चिवटे यांना पाठिंबा दिसत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर शिंदेसेनेतील अंतर्गत मतभेद आणि उमेदवारीसाठी सुरू असलेली रस्सीखेच यामुळे पक्षाची मोठी गोची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चिवटे यांनी गेल्या काही काळापासून मतदारसंघात संपर्क वाढवत निवडणुकीची तयारी केली होती. त्यामुळे जागा भाजपला गेल्यानंतरही ते माघार घेण्याच्या भूमिकेत नसल्याचे सांगितले जात आहे.
एकीकडे महायुतीचा धर्म पाळत जागावाटपाचा निर्णय स्वीकारण्याचे आव्हान शिंदेसेनेसमोर आहे, तर दुसरीकडे चिवटे यांच्या ठाम भूमिकेमुळे पक्षांतर्गत दबाव वाढला आहे. त्यामुळे आता मंगेश चिवटे पुढील भूमिका काय घेतात आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मंगेश चिवटे यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार कायम ठेवल्यास भाजप-शिंदेसेना युतीच्या स्थानिक राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील उमेदवारीचा तिढा, चिवटे यांची भूमिका आणि पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.
मंगेश चिवटे हे शिक्षकांच्या सर्व प्रश्नांवर गेल्या तीन वर्षांपासून सातत्यानं खांद्या ला खांदा लावून लढत आहे. उमेदवारी बाबत एका वृत्त वाहिनीवर बोलताना चिवटे म्हणाले की शिक्षकांच्या विनंती व पाठिंब्यावर मि निवडणुकीच्या आखाडय़ात उतरलो आहे “त्यामुळे असंख्य शिक्षकांच्या विश्वासला तडा जाऊ देता येणार नाही कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहे. ” महायुतीतच सुरू असलेल हायहोल्टेज ड्राम्यामूळे पुणे शिक्षक पदवीधर मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे.
जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर चिवटे मैदान सोडणार का? की शिंदे यांच्या हस्तक्षेपातून काही नवा तोडगा निघणार? याचे उत्तर आता पुढील राजकीय हालचालींनंतर स्पष्ट होणार आहे.
