करमाळा_चौफेर
करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी सध्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करत असून, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासह शेतीसाठी पाणी व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची भेट घेऊन केली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना–२०१७, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०१९ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ या योजनांमधील जाचक अटी व तांत्रिक त्रुटींमुळे अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. २०१७ च्या योजनेतील दीड लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्जाच्या रकमेबाबतच्या अटींसह विविध अडचणींमुळे अनेकांना लाभ मिळाला नाही. त्यानंतर २०१९ च्या योजनेतही अनेक शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे या तिन्ही योजनांतील पात्र लाभार्थ्यांच्या अडचणींचा पुनर्विचार करून, जाचक अटींमध्ये न अडकवता त्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.
सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत जनावरांसाठी चारा पिके आणि शेतकऱ्यांच्या फळबागा जिवंत ठेवणे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे बॅकवॉटर परिसरातील शेतीपंपांना सलग आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा.करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दहिगाव सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन तातडीने सोडण्यात यावे,कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्यासाठी विशेष आवर्तन मंजूर करून ते तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कर्जमुक्ती, चारा पिके व फळबागांचे संरक्षण, सलग आठ तास वीजपुरवठा आणि सिंचनासाठी दहिगाव व कुकडी प्रकल्पाचे आवर्तन या सर्व प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केली.
