(करमाळा_चौफेर शंभू फरतडे✍️)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांशिवाय समाजाची प्रगती अशक्य असून “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आणि मार्गदर्शक आहे, असे ठाम मत अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार नासीर कबीर यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना, करमाळा यांच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी बोलताना नासीर कबीर म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही,” या त्यांच्या विचारातून शिक्षणाची ताकद स्पष्ट होते. शिक्षणाच्या बळावरच अन्याय, अज्ञान आणि विषमता दूर करून समाजात समता प्रस्थापित करता येते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून केवळ अभिवादन न करता त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी आदरांजली ठरेल. प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके, सचिव नरेंद्रसिंह ठाकूर, सहसचिव तुषार जाधव, प्रसिद्धी प्रमुख सचिन चव्हाण, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांच्यासह पत्रकार जयंत दळवी, रितेश कटरीया, रमेश आगरवाल आदी उपस्थित होते


