July 22, 2026
IMG-20260721-WA0104

करमाळा_चौफेर

भीमा कोरेगाव येथील जयस्तंभाच्या अस्तित्वाची लढाई, त्यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया आणि समाजाची भूमिका याविषयी जनजागृती करण्यासाठी करमाळा शहरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ अभंग यांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सिद्धार्थ नगर येथील त्यागमूर्ती माता रमाई बुद्ध विहार येथे होणार असल्याची माहिती दशरथआण्णा कांबळे यांनी दिली.

दशरथआण्णा कांबळे म्हणाले की, 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे अल्पसंख्य शूर महार सैनिकांनी पेशवाईविरुद्ध पराक्रम गाजविला. त्या शौर्याच्या स्मरणार्थ तेथील जयस्तंभ उभारण्यात आला असून, या लढाईत शहीद झालेल्या वीरांची नावे त्यावर कोरण्यात आली आहेत. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या जयस्तंभाला अभिवादन करून येथून प्रेरणा घेत सामाजिक परिवर्तनाची व्यापक चळवळ उभी केली.आज दरवर्षी 1 जानेवारी रोजी लाखो भीमसैनिक जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे जातात. मात्र, जयस्तंभाच्या अस्तित्वासंदर्भातील न्यायालयीन लढाई, त्यावरील विविध दावे, तसेच या ऐतिहासिक स्मारकाच्या संरक्षणासाठी वर्षभर कोणत्या प्रकारे संघर्ष करावा लागतो, याची माहिती समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर सध्या जयस्तंभासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत असलेले दादाभाऊ अभंग हे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. जयस्तंभाच्या इतिहासापासून ते सध्याच्या घडामोडींपर्यंत विविध मुद्द्यांवर ते उपस्थितांना माहिती देणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.या प्रबोधनपर कार्यक्रमास समाजातील सर्व भीमसैनिक, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजजागृतीच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन दशरथआण्णा कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *