करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)
‘करमाळा चौफेर’च्या ‘लेखा जोखा’ या विशेष सदरात आज आपण करमाळ्याच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक असलेल्या बागल गटाचा राजकीय प्रवास आणि सद्यस्थितीचा आढावा घेणार आहोत.
शून्यातून विश्व: स्व. दिगंबरराव (मामा) बागल यांचा संघर्ष
मांगी गावचे सरपंच ते राज्यमंत्री असा स्व. दिगंबरराव (मामा) बागल यांचा प्रवास संघर्षमय आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा ठरला. त्यांची राजकीय कारकीर्दही माजी आमदार जयवंतराव जगताप गटातूनच सुरू झाली. अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मामांनी तालुक्यात बस्तान बसवले. आदिनाथ काबीज केला, मकाईची उभारणी केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी करमाळ्यासाठी वरदायिनी ठरलेल्या “दहिगाव उपसा योजनेस मंजुरी मिळवून कामास सुरुवात केली,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून कार्यकर्ते पदावर बसवले पण पुढे त्यांनी मोहिते पाटील यांच्यापासून दूर जाण्यास सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून मकाईसाठी मदत मिळवून घेतली, पण त्याच बरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश देखील केला. मोहिते पाटील यांचा जिल्ह्यात दबदबा असताना डिगामामांनी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश खूप गाजला होता असे जेष्ठ पत्रकार यांनी सांगतीले.मामांच्या या कूटनीती च्या राजकारणात मामांचे साडू विलासराव घुमरे सर यांची चाणक्य नीती महत्वाची होती हे नाकारून चालणार नाही. मामांनी पदे देऊन अनेक कार्यकर्ते भक्कम केले. तात्यासाहेब मस्कर, वामनदादा बदे,स्व कल्याणभाऊ गायकवाड,रमेश आण्णा कांबळे अशी अनेक नावे सांगता येतील की ज्यांना मामांनी खूप महत्त्वाच्या पदावर बसवले.
मामांच्या निधनानंतर मात्र विलासराव घुमरे यांची कुटनीती काम करेना झाली. रश्मीदीदी बागल यांच्या आमदारकीच्या महत्त्वाकांक्षेमुळे जुने कार्यकर्ते दुखावले. इथून खरी बागल गटाच्या उतरणीस सुरुवात झाली. पदे देऊन मोठी केलेली नेतेमंडळी त्यांच्यापासून दुरावली,एवढेच काय पण एकेकाळी किंगमेकर म्हणून भूमिका पार पाडलेले विलासराव घुमरे यांनी सुद्धा रश्मी बागल यांना विरोध केला व थेट संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला. आजमितीस शिंदे गटातील जवळपास सत्तर टक्के कार्यकर्ते हे पूर्वाश्रमीचे बागल गटातील आहेत.आता शिंदे-बागल युती असल्याने या आपल्याच कार्यकर्त्यांना परत बागल गटात खेचून घेणे हे नेतृत्वासमोरील प्रमुख आव्हान आहे.
नाईलाजाने राजकारणात: शामलमामी, रश्मीदिदी व -दिग्विजय बागल यांचा प्रवास
मामांच्या अकाली निधनानंतर नाईलाजाने बागल कुटुंबास राजकारणात उतरावे लागले. शामलताई (मामी) बागल मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून विजयी झाल्या. याच काळात मकाई, व पंचायत समितीवर सत्ता मिळवली. पुढे रश्मीदीदी बागल यांच्या नेतृत्वाखाली मोहिते-पाटील यांचा दारुण पराभव करत आदिनाथवर देखील निर्विवाद वर्चस्व मिळवले.

‘सोन्याचा चमचा’ आणि संघर्षाची दुसरी बाजू
मामांच्या निधनानंतर आमदारकी, आदिनाथ, मकाई, पंचायत समिती मिळाली असली तरी रश्मीदीदी बागल व दिग्विजय बागल यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. ‘सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले, वडिलांचा आयता गट मिळाला’ असे रश्मीदीदी दिग्विजय यांच्याविषयी विरोधक बोलत असले तरी वास्तव वेगळे आहे.विधानसभा निवडणुकीत हातातोंडाशी आलेला विजय केवळ एका चुकीमुळे गेला. रश्मी बागल यांचे मुख्याध्यापकांच्या सहीने सत्यप्रत केलेले मतदान मोजले असते – जे महाराष्ट्रात सर्वत्र मोजले गेले – तर त्यांचा विजय निश्चित होता व आज गटाची राजकीय स्थिती वेगळी असती.

आदिनाथ चे खापर पंचायत समिती गेली.
विधानसभा पराभवातून धडा घेण्याऐवजी बागल यांनी आपला हेका सोडला नाही. अनेक जेष्ठ नेते मंडळीची नाराजी दुर करण्यात यश आले नाही,घुमरे सर यांच्याबरोबर काही काळ झालेला दुरावा बागल बहीण-भावास मोठी किंमत चुकवणारा ठरला. आदिनाथच्या बाबतीत झालेला राजकीय चक्रव्यूह भेदण्यात अपयश आले व आदिनाथच्या दुरवस्थेचे सर्व खापर बागलांवर फोडण्यात विरोधक यशस्वी झाले. पंचायत समितीची हातची सत्ता गेली. मार्केट समितीतील सत्तास्थापनेचा धाडसी निर्णयही थोडा घाईचा ठरला.

दहा वर्षांनंतर गुलाल: पण आव्हाने कायम
राष्ट्रवादी सोडून शिवसेना ठाकरे, नंतर शिंदेसेना, नंतर भाजप अशी वाटचाल करत अखेर दहा वर्षांनंतर रश्मी बागल यांच्या जिल्हा परिषद विजयाने बागल गटाला गुलाल उधळण्याची संधी मिळाली. गटात चैतन्य पसरले, जिल्हा परिषद गटनेते पद मिळाले.मात्र हक्काच्या अनेक गावात मिळालेले कमी मतदान, पूर्वाश्रमीचे कट्टर समर्थक संतोष वारे यांनी घेतलेले मतदान, तसेच एकास एक लढत असती तर काय झाले असते याचा पुरता अभ्यास नेतृत्वाला आहे. भविष्यात मोठी लढाई आहे याची जाणीव त्यांना असणार आहे.
भाजपमध्ये प्रवेश, पण ‘अच्छे दिन’साठी संघर्ष बाकी
भाजपमध्ये जाऊन गुलाल मिळाला असला तरी मकाईसाठीचा मोठा निधी अजून बाकी आहे. मकाई सुरू करून ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक यांना ‘अच्छे दिन’ दाखवावे लागणार आहेत. सध्या भाजप म्हणजे महासत्ता आहे. भविष्यात या पक्षात अनेक मातब्बर प्रवेश करू शकतात. सध्या भाजपमध्ये असलेले झोळ सर, कन्हैयालाल देवी व मुळ भाजपचे चिवटे यांची विधानसभा निवडणुकीतील भूमिका काय असणार हे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळेच बागल बहीण-भावास भाजपमधला आपला खुट्टा मजबूत करावा लागणार आहे.
‘मामांसारखा पोशाख’ करून चालणार नाही
कार्यकर्त्यांना व जनतेला फक्त गोड बोलून चालणार नाही. मामांसारखा हावभाव व पोशाख करून जनता दरबारामध्ये आपलेच कार्यकर्ते बसवून वाहवा करून घेऊन जमणार नाही, तर प्रत्यक्षात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा लागणार आहे. जमिनीवर राहून प्रत्येकाशी वरवरचा नाही तर अंतरमनातून संवाद साधावा लागणार आहे. पुढचा संघर्ष व लढाई मोठी असून जे दुरावले आहेत त्यांना विश्वासाने जवळ करावे लागणार आहे व जे जवळ आहेत ते लांब जाऊ नयेत याची काळजी घ्यावी लागणार आहे. तरच बागल गटाला ‘अच्छे दिन’ येतील,व बागल आमदारकीला दणक्यात कमबॅक करू शकतो.
बागल गट आता संक्रमण काळातुन जात आहे. यामुळे नव्याने कार्यकर्त्यांचे संघटन करणे महत्त्वाचे आहे. तर सध्या बागल गटाच्या ताब्यात असलेल्या मकाई व पंचायत समिती या संस्थावर बागल गटाचे नवीन पदाधिकारी पदावर आहेत. यांना अजुन प्रशासकीय कामाचा अथवा सहकाराचा जादा अनुभव नाही. हे एक मोठे आव्हान असल्याने बागल नेतृत्वास आता तालुक्यातील सर्वच प्रश्नांचा अभ्यास करून सत्ताधारी पक्षात असले तरी मतदार संघात मात्र प्रमुख विरोधकांची भुमिका पार पाडावी लागणार आहे. आणि हीच खरी नेतृत्वाची कसोटी असेल. त्याचबरोबर विधानसभा कोणी लढावी या बाबत देखील गटात दोन मतप्रवाह आहेत ते ऐनवेळेस धोक्याचे ठरू शकते त्यामुळे तसा ठोस संदेश आत्तापासूनच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष द्यावा लागणार आहे.

बागल गटाच्या पुढील वाटचालीस करमाळा च्या मनपूर्वक शुभेच्छा
पुढील भागात माजी आमदार संजयमामा शिंदे गटाच लेखा लेखा जोखा प्रसिद्ध होणार आहे..वाचत रहा करमाळा_चौफेर न्युज पोर्टल
