करमाळा_चौफेर (शेलगाव क/ )
करमाळा तालुक्यातील शेलगाव (क) येथे आज दि. 8 मे रोजी पूजा, होम-हवन करून हनुमंताच्या जुन्या मूर्तीचे विसर्जन व विधिवत नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावात करण्यात आली. पंढरपूर येथून आणलेल्या हनुमंताच्या मूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढून मंदिरात स्थापना करण्यात आली. याप्रसंगी 2 दिवस कीर्तन, भजन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नागनाथ महाराज यात्रा उत्सव समितीच्या वतीने उत्सवातील शिल्लक रकमेतून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. यात्रा उत्सवातून शिल्लक राहिलेल्या रकमेमधून गावातील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केलेला आहे.
यापूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व विकास निधीतून गावातील जिल्हा परिषद शाळेचा व अंगणवाडीचा चेहरामोहरा बदललेला आहे. ‘आता मंदिरांचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास’ ग्रामस्थांनी घेतला आहे.
मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घेणारे आजिनाथ वीर व आत्माराम वीर यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. प्रसाद व भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
सरकारी निधीची वाट न पाहता गावकरी स्वतःच्या खिशातून व यात्रेच्या शिल्लक पैशातून आधी शाळा-अंगणवाडी सुधारली, आता मंदिरे सुधारत आहेत. ‘स्वावलंबी गाव’ कसं असतं याचं हे उदाहरण शेलगाव ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.

