August 19, 2026
IMG-20260818-WA0041

करमाळा_चौफेर

करमाळा तालुक्यातील साडे–शेलगाव सौंदे या महत्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची साईडपट्टीच शिल्लक न राहिल्याने येथे दररोज होण्याची शक्यता वाढली आहे.आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यालगतचे जागेवर अतिक्रमण केले आहे.रस्त्यावरच सुर्यफूल, उडीद यासारखा शेतीमाल वाळत टाकला जातो. रस्त्याला चिटकून खताचे मोठे ढिगारे टाकण्यात आले आहेत. रस्त्याच्या कडेला जनावरे बांधली जात आहेत.या सर्व प्रकारामुळे रस्ता अरुंद झाला आहे. समोरून चारचाकी वाहन, एस.टी. किंवा ट्रक आल्यास दुचाकीस्वारांना साईड देण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. साईडपट्टी नसल्याने अपघात होण्याची भीती नेहमीच असते.या गंभीर समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुज्ञ नागरिकांनी अनेकवेळा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत . मात्र आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, “दुर्दैवाने येथे एखादा मोठा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण?” प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून साईडपट्टी मोकळी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

रस्त्या लगत असलेल्या साईडपट्टीवर मोठ्याप्रमाणात गवत आले आहे तसेच झाडी, झुडपं वाढली आहेत. याची साफसफाई केली जावी अशी देखील मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *