करमाळा_चौफेर (✍ शंभू फरतडे)
करमाळा तालुक्यात पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली खासगी अनाधिकृत सावकारीचा धुमाकूळ सुरू आहे. बँकांचे कर्ज न मिळणे, सिबील खराब असणे आणि कमी क्षेत्रामुळे शेतकरी वर्ग या सावकारांच्या जाळ्यात अडकत आहे. सावकारीच्या तगाद्यामुळे अनेक युवकांचे आणि शेतकऱ्यांचे बळी जात असून तालुक्यात यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये खासगी सावकारांकडून जमिनी हडपल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशन आणि न्यायालयात प्रलंबित आहेत. एकर किंवा दोन एकर शेतीसाठी खत किंवा खरेदी खताच्या नावावर सावकार 10 ते 15 लाख रुपये कर्ज देतात. प्रत्यक्षात त्या ठिकाणच्या जमिनीचा बाजारभाव 30 ते 40 लाख रुपये असतो. सुरुवातीला 3 रुपयांपासून 5 रुपये टक्क्यापर्यंत व्याजाने कर्ज दिले जाते. शेतीत किंवा व्यवसायात अडचण आल्याने शेतकरी व्याज आणि मुद्दल परत करू शकत नाही. त्यानंतर नाईलाजाने त्याला जमिनीचा ताबा सावकाराला द्यावा लागतो.
पूर्वीची ही सावकारीची पद्धत आता बदलली आहे. आता फायनान्स किंवा पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज दिल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. कर्ज देताना एक ते दोन वर्षांचे व्याज आगाऊच कापून घेतले जाते आणि उर्वरित रक्कम हातात दिली जाते. मात्र कागदावर संपूर्ण मुद्दल कर्ज म्हणून कायम राहते. त्यामुळे कर्ज बुडण्याचा प्रश्नच येत नाही आणि व्याजही आधीच वसूल झालेले असते. पतसंस्था आणि फायनान्सच्या आडून अशी सावकारी सुरू असल्याची चर्चा शहरात उघडपणे सुरू आहे.
वसुलीच्या तगाद्यामुळे एखाद्याने आत्महत्या केली किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला तरी कागदोपत्री पुरावा असल्याचे कारण देत संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नाही. तसेच अशा पीडित कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला पैसे देऊन गप्प केले जाते, अशीही चर्चा आहे.या प्रकरणात तक्रारदार पुढे येत नसल्याने आणि लेखी पुरावे नसल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. याच फायदा घेऊन खासगी सावकार परस्पर मिटवा मिटवी करून सहीसलामत सुटतात.
अशा प्रकारे सावकारी किंवा इतर प्रकरणात ब्लॅकमेल किंवा टॉर्चर केल्याने आत्महत्या केल्यची घटना घडली आणि तक्रारदार नसेल तरीही तो सामाजिक गुन्हा मानून संबधित प्रशासनाने सुओ मोटो अंतर्गत स्वतःहून गुन्हा दाखल करावा. आत्महत्या केलेल्या युवकांचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअँप चॅट तपासून संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
