करमाळा_चौफेर
देशात होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या 2026 च्या सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती दिली आहे. गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांसह सर्व शिक्षकांवर हा निर्णय लागू होणार आहे.
केंद्र सरकारच्या गृह सचिवांनी जनगणना अधिनियम 1948 आणि जनगणना नियम 1990 अंतर्गत अर्धशासकीय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला आहे. जनगणनेचे काम वेळेत आणि निर्विघ्न पार पडावे, यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना त्याची जबाबदारी दिली जाणार आहे.

उपसचिवांचे सर्व CEO ना पत्र
शासनाच्या या निर्णयानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उपसचिव वैशाली डिंगे यांनी पत्र पाठवून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. 2026 मधील सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये,असे स्पष्ट आदेश आहेत.
करमाळा पंचायत समिती व ZP शाळांतील ‘क’ व ‘ड’ वर्गाचे कर्मचारी आणि शिक्षक यांना यंदा बदली मिळणार नाही. अनेकांनी घराजवळ येण्यासाठी बदल्यांचे अर्ज भरले होते. अनेकांना बदली मुळे गावाजवळची घरा जवळची शाळा सोडून लांब जावे लागणार होते यामुळे “कही खुषी कही गम” असे वातावरण आहे..ह्या बदली प्रक्रिया साठी शिक्षक कर्मचाऱ्यांना आता 2027 ची वाट पाहावी लागणार आहे.



