करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
करमाळा तालुक्यात आदिनाथ सह अन्य कारखान्यांचे देखील धुराडे पेटले नाहीत पर्यायाने शेतकऱ्यांना बाहेर तालुक्यातील कारखान्यावर उस गाळपास न्यावा लागला.कारखान्यांचे धुराडे पेटले नाहीत मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून नेते मंडळी मात्र दररोज “जाळ अन धूर संगटच “काढत आहेत.
आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी नवीन धमाका केला असून आदिनाथ च्या बारामती अग्रो बरोबर झालेल्या करारावेळी धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्याचा आरोप केला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा बारामती एग्रोबरोबर भाडेपट्टी करार होण्यापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीतील धक्कादायक माहिती पाटील गट सभासदांना करून देणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी जाहीर केले आहे. या घोषणेने करमाळा तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
“सध्या करमाळा तालुक्यातील राजकारण हे आदिनाथ कारखान्याच्या अवतीभवती फिरत असताना विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना घेरण्याचे काम विरोधक करत आहेत. आदिनाथ कारखान्याच्या दुरावस्थेची चर्चा न होता केवळ आमदार पाटील यांना टार्गेट केले जात आहे. पण आता आमच्याही हाती बरीच धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे,” असे तळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केेल आहे.
तळेकर यांनी पुढे आरोप केला की, “यातून माजी आमदार संजयमामा शिंदे व बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी आदिनाथबाबत रचलेल्या कुटील डावाबाबत सभासदांना सर्व काही समजलेच पाहिजे. यावेळी या दोघांना दिग्विजय बागल व रश्मी बागल यांनी दिलेली छुपी साथ सुद्धा हेतूसहीत बाहेर पडणे गरजेचे आहे.” “यामुळेच आता पाटील गटाकडून एक पत्रकार परिषद घेतली जाणार असून यात आदिनाथच्या विकासात अडथळा आणणाऱ्या या झारीमधील शुक्राचार्यांचा खरा चेहरा आम्ही उघडा पाडणार आहोत . लवकरच करमाळा तालुक्यातील प्रसिद्धीमाध्यमांना आम्ही खरी माहिती तथ्यासह देणार आहोत. “खऱ्या अर्थाने विरोधकांची आदिनाथबाबतची कुटील नीती जनतेसमोर उघडी पाडणारच” असा निर्धार प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केला आहे.
सुनील तळेकर यांच्या हाती नेमके काय पुरावे लागले आहेत व त्यात काय तथ्य असेल, व खरच आदिनाथ चालू होवू नये यासाठी कटकारस्थान रचली जात आहेत का ? या कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

