करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्यामध्ये सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेला बळीराजा आपली उभी पिके जगवण्यासाठी जिवाचे रान करत आहे. मात्र, अशातच करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या दिवेगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकट कोसळले आहे.
पारेवाडी तलावावर असलेल्या दिवेगव्हाणमधील सहा शेतकऱ्यांच्या तब्बल १० विद्युत मोटारी (शेतीपंप) अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या ढीम्म कारभारामुळेच चोरट्यांचे धाडस प्रचंड वाढले असल्याचा संतप्त आरोप हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या पारेवाडी तलावामध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विहिरी आणि कूपनलिकांचे जलस्रोतही मोठ्या प्रमाणावर आटत चाललेले आहेत. दिवेगव्हाण आणि करमाळा बॅकवॉटर परिसरात केळी, ऊस यांसारख्या बागायती पिकांची सर्वाधिक लागवड होते. हाता-तोंडाशी आलेली ही पिके जगवण्यासाठी शेतकरी अक्षरशः धडपडत आहेत. त्यातच भविष्यात वीजपुरवठा केवळ दोन तासांवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खतांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत अशा अत्यंत बिकट आणि आर्थिक कोंडीच्या परिस्थितीत, शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभ्या केलेल्या शेतीला आधार देणाऱ्या मोटारींवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पिके जगवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र एक करत आहेत. मात्र, चोरट्यांनी मोटारी फोडल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक आघात झाला आहे. एका १५ एचपीच्या मोटारीची किंमत सध्या बाजारात ८५,००० ते १ लाख रुपयांच्या घरात आहे. चोरीला गेलेल्या मोटारी दुरुस्त करण्यासाठी तांब्याचे कॉपर वाइंडिंग, नवीन पार्ट्स आणि वाहतूक खर्च मिळून प्रत्येक शेतकऱ्याला किमान दोन ते अडीच लाख रुपयांचा फटका बसला आहे. बँकांचे कर्ज आधीच डोक्यावर असताना हा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
याप्रकरणी दिवेगव्हाण येथील शेतकरी अभिमन्यू संभाजी खाटमोडे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३२४(२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा (FIR No: 0846/2026) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एफआयआरमध्ये केवळ ७३,५०० रुपयांच्या चोरीचा उल्लेख केला असला, तरी प्रत्यक्ष बाजारात तांब्याच्या तारांचा स्क्रॅपचा दर खूप जास्त असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी डल्ला मारला. दुसऱ्या दिवशी, २४ सप्टेंबर रोजी सकाळी शेतकरी अभिमन्यू संभाजी खाटमोडे (वय ५९) हे नेहमीप्रमाणे मोटार चालू करण्यासाठी गेले असता, त्यांना मोटारींचे नटबोल्ट उघडून बाडी (कव्हर) फोडलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांनी तातडीने इतर शेतकऱ्यांना बोलावून घेतले. पाहणी केली असता तब्बल १० मोटारींची अत्यंत निर्घृणपणे तोडफोड करून त्यातील जवळपास १०५ किलो तांब्याची तार चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले.
दिवेगव्हाण येथे झालेल्या मोटार चोरीच्या घटनेत खालील शेतकऱ्यांच्या मोटारी व तारा चोरी गेल्या आहेत.
१. अभिमन्यू संभाजी खाटमोडे: १५ एचपी (२ मोटारी) – २२ किलो तार व ७.५ एचपी (लुबी) – ६ किलो तार.
२. गणपत गजेंद्र खाटमोडे: १५ एचपी – ११ किलो तार.
३. सतीश गजेंद्र खाटमोडे: १५ एचपी – ११ किलो तार.
४. भरत गणपत खाटमोडे: १५ एचपी – २२ किलो तार.
५. अक्षय बबन तनपुरे: १५ एचपी – ११ किलो तार.
६. उमेश भागवत खाटमोडे: १५ एचपी (२ मोटारी) – २२ किलो तार
करमाळ्याच्या पश्चिम बॅकवॉटर भागामध्ये १५ एचपीच्या मोटारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील काही महिन्यांच्या कालावधीत वाशिंबे, जिंती, पारेवाडी, केत्तूर २, गोयेगाव, सोगाव, राजुरी या उजनीच्या बॅकवॉटर भागांतील शेतकऱ्यांच्या अनेक मोटारी चोरीला गेल्या आहेत. वारंवार अशा घटना घडूनही स्थानिक पोलिसांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. पोलिसांकडून मोटार चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास होताना दिसत नाही. गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात किंवा त्यांचा माग काढण्यात पोलिसांना अद्याप यश का येत नाही असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमागे आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य संघटित गुन्हेगारी टोळी असण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. या टोळीला स्थानिक पातळीवर मदत करणाऱ्या व चोरीचे तांबे खरेदी करणाऱ्या स्थानिक भंगार माफियांची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे. तपासाला गती नसल्याने गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. त्यामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या गंभीर प्रकरणाची जातीने दखल घेण्याची नितांत गरज आहे. गुन्हे शोधासाठी तातडीने विशेष तपास पथके नेमून या संघटित टोळीच्या मुसक्या आवळाव्यात, अशी आर्त हाक दिवेगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
