करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍🏻)
करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेला देण्याच्या प्रस्तावावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रश्मीदिदी बागल यांनी दिली.
करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील हाळगाव येथील एका शैक्षणिक संस्थेला देण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता. या निर्णयामुळे करमाळा तालुक्यात तीव्र नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर रश्मी बागल यांनी जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन करमाळा तालुक्याच्या वतीने निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले यामध्ये मांगी तलावाच्या पाण्यावर करमाळा तालुक्यातील १३ गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे अवलंबून आहे,उजनी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी या तलावामार्फत करमाळ्याच्या दुष्काळी भागाला दिले जाते,तलावातील पाणी अन्यत्र वळविल्यास करमाळा तालुक्यावर मोठा अन्याय होईल या बाबींचा ठळक उल्लेख होता.
रश्मीदिदी बागल यांनी मांडलेले मुद्दे समजून घेतल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित विभागाकडून संपूर्ण वस्तुस्थिती सादर होईपर्यंत सदर निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. दरम्यान, बागल यांनी तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवून अतिरिक्त पाणी इतरत्र देण्याचा पर्यायही शासनास सुचविला आहे. मात्र, करमाळा तालुक्याच्या हक्काच्या पाण्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
आंदोलनाची पार्श्वभूमी
“मांगीचे पाणी हाळगावला सोडू नये यासाठी करमाळा तालुक्यात सर्वपक्षीय घंटानाद व रास्ता रोको आंदोलन झाले होते. या दरम्यान रश्मी बागल व दिग्विजय बागल यांना देखील लक्ष्य केले गेले होते. बागल कुटुंबीयांनी रस्त्यावर उतरावे अशी मागणी होत होती. मात्र रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी संयमी भूमिका घेत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा मार्ग स्वीकारला.
“मांगी तलाव व यासाठी दिलेल्या जमिनी व पाण्याचा हक्क हा आमचा स्वाभिमान आहे. आमच्या स्वाभिमानाला ठेच लागू देणार नाही,” अशी भूमिका घेत त्यांनी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. मांगी तलावाच्या पाण्याबाबतचा निर्णय स्थगित झाल्याने करमाळा तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रस्त्यावर उतरून संघर्ष केलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला तसेच रश्मी बागल यांच्या पाठपुराव्याला यश आले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
