करमाळा_चौफेर
शिवसंस्कार प्रतिष्ठान, निमगाव (ह.) यांच्या वतीने जि.प. प्रा. शाळा, नीळवस्ती व जि.प. प्रा. शाळा, निमगाव (ह.) येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा २०२६ चे उत्साहपूर्ण व दिमाखदार आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर भगव्या उत्साहाने आणि शिवमय वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. उपस्थितांसह विद्यार्थांनी शिवचरित्रातील प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत स्वराज्य, संस्कार आणि शिक्षण यांचा संदेश आत्मसात केला.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसंस्कार प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या, लेखनसाहित्य व इतर आवश्यक वस्तूंचे वितरण करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा आणि आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शिवराज्याभिषेक सोहळा २०२६ निमित्त दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १०\३० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव (ह.) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निळवस्ती येथील विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी निळवस्ती शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब जाधव व निमगाव (ह.) शाळेचे मुख्याध्यापक राम मोरे उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला असून, सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडवून आणल्याबद्दल उपस्थितांनी शिवसंस्कार प्रतिष्ठानचे कौतुक केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
