June 29, 2026
IMG-20260625-WA0002(1)

करमाळ्यात पावसाळ्यापूर्वी १०-१२ कोटींची उधळपट्टी; केवळ नावापुरते डांबर, १० दिवसांत पुन्हा खड्डेच खड्डे

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍🏻)
तालुक्यात रस्ते दुरुस्ती आणि नव्या रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचा श्रेयवाद राजकीय नेत्यांमध्ये सुरू असतानाच, दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याच्या नावाखाली १० ते १२ कोटी रुपये अक्षरशः उधळले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.नियमाप्रमाणे डांबर, कचखडी व मोठी खडी टाकून रोलिंग करून खड्डे कायमस्वरूपी बुजवणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात किरकोळ डांबर आणि अत्यल्प खडी टाकून “नावापुरती” मलमपट्टी केली जात आहे. काही ठिकाणी तर डांबर न टाकताच केवळ खडी टाकून खड्डे बुजवल्याचे दिसून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

●दरवर्षी तोच खेळ !तोच रस्ता तेच खड्डे●

तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी जवळपास 10-11 कोटी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र त्याच-त्याच रस्त्यांवर दरवर्षी खड्डे बुजवूनही पावसाचे २-३ हप्ते पडताच रस्ते पुन्हा खड्डेमय होतात. कमी डांबर आणि कमी खडी वापरल्यामुळे बुजवले खड्डे अवघ्या ८ ते १० दिवसांत “आहे तसे” होत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. “दिवसा ढवळ्या दरोडा?”

निधी आणण्यासाठी श्रेयवाद लावणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, दुसरीकडे अधिकारी-ठेकेदारांच्या मिलीभगतीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. “खड्डे बुजवण्याची मोहीम म्हणजे फक्त ठेकेदार जगवण्याचा कार्यक्रम आहे का?”, “निवडलेल्या रस्त्यावर नेमके किती खड्डे होते, त्यांची लांबी-रुंदी काय होती, त्यासाठी किती निधी खर्च झाला आणि क्वालिटी कंट्रोल तपासणी कोण करतो?” असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.खातेनिहाय चौकशीची मागणी

नागरिकांच्या मते, खड्डे बुजवण्याच्या कामातच “मोठा खड्डा” मारला जात आहे आणि त्याचा भार शेवटी सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडत आहे. अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमतातून यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, या कामाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.एकीकडे २०० कोटींच्या नव्या रस्त्यांची घोषणा आणि दुसरीकडे १० कोटींच्या दुरुस्तीतही दर्जाहीनपणा, यामुळे “विकास” आणि “वास्तव” यातील तफावत पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

सालसे -साडे रस्त्यावर गेल्या वर्षी पण खड्डे बुजवले पन आठ दिवसांत पुन्हा खड्डे पडले होते आज पुन्हा खड्डे बुजवणे सुरू यात डांबर अत्यल्प वापरले जात आहे,हि निकृष्ट कामे थांबली पाहिजेत-रमेश घाडगे ( सासले)

    चौकशी करून संबंधित ठेकेदार यास पुन्हा खड्डे बुजविण्याचे आदेश देऊ अन्यथा बीलं आदा न करता कारवाई केली जाईल- अभिषेक पवार – ( उप अभियंता करमाळा सार्वजनिक बांधकाम विभाग )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *