करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)✍️
तहसील कार्यालयामार्फत दर पाच वर्षांनी राबवली जाणारी नवीन रेशन कार्ड वाटपाची मोहीम गेल्या पंचवीस वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही मोहीम पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नेरले ता. करमाळा येथील माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
स्वातंत्र्यापासून सन १९९७ ते २००० पर्यंत तहसील कार्यालयामार्फत तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल यांच्या माध्यमातून प्रत्येक पाच वर्षांनी नवीन रेशन कार्ड वाटपाची मोहीम राबवली जात होती. या मोहिमेतून जन्मलेल्या बालकांचे, लग्न होऊन आलेल्या सुनांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट केले जात असे. नवीन वास्तव्यास आलेल्यांना नवीन कार्ड दिले जात, तर मयत, लग्न होऊन परगावी गेलेल्या व नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेल्यांची नावे कमी केली जात. प्रत्येक कुटुंबाकडून फॉर्म भरून सरकारी फी घेऊन नवीन शिधापत्रिका दिली जात असल्याने नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज पडत नसे.
१०९७\९८ साली दारिद्र्य रेषेचा सर्व्हे होऊन यादीतील लोकांना पिवळे रेशन कार्ड व इतरांना केशरी कार्ड २००० साली वाटप केले. कार्ड संपल्यामुळे त्यानंतर केवळ पुरवणी देण्यात येत आहे.
माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे की, “त्यानंतर पंचवीस वर्षे कार्ड वाटप न केल्यामुळे प्रत्येक कार्डधारकाला तहसील पुरवठा कार्यालय येथे जाऊनच अर्ज करावा लागत आहे. अर्ज केल्यानंतर वर्ष-दोन वर्षे हेलपाटे घालून देखील त्यांना नवीन कार्ड, नाव समाविष्ट करणे, कमी करणे अशी कामे होत नाहीत. आज कार्ड संपूर्ण जीर्ण झाली आहेत. काही नागरिक वृद्धापकाळामुळे व पैशांअभावी करमाळा येथे जाऊन अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे पंचवीस वर्षांपासून त्यांचे कार्ड बंद आहेत. ते धान्यापासून व इतर शासकीय लाभापासून वंचित आहेत. विनाकारण नागरिक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे.”
ही मोहीम पुन्हा चालू करून नागरिकांचा त्रास कमी करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांना लेखी निवेदन देण्यात आल्याचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी सांगितले.


