June 24, 2026
IMG-20260621-WA0031

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे )

स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटूनही करमाळा तालुक्यातील मौजे कुंभेज गावाला स्वतंत्र स्मशानभूमीच नाही. या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील सुहास अंगद साळुंके यांचे आज दि. २४/०६/२०२६ पासून आमरण उपोषण सुरू होणार आहे.

तहसीलदार मार्फत वनमंत्री गणेश नाईक यांना दिलेल्या निवेदनात साळुंके यांनी म्हटले आहे की, कुंभेज गावातील गायरान वनविभागाच्या गट नं. २३मधील स्मशानभूमीसाठी २१ गुंठे जागा उपलब्ध आहे. ही जागा वनविभागाकडून ग्रामपंचायतीकडे वर्ग/हस्तांतरित करण्याचे आदेश मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे.

“स्वातंत्र्य काळापासून कुंभेज गावाला स्मशानभूमीच नाही. त्यामुळे गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. शेवटचा प्रवासही खडतर झाला आहे”, असे साळुंके यांनी निवेदनात नमूद केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या जागेसाठी वनविभागाकडे पुराव्यानिशी कागदपत्रे सादर केली आहेत. करमाळा तहसील कार्यालयाशीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने वैतागलेल्या साळुंकेंनी अर्ज दिल्यापासून २१ दिवसांनी, म्हणजेच आजपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता.

सोबत त्यांनी सन १९५७ पासूनचे ७\१२ उतारे, फेरफार तसेच जागेचा नकाशा जोडला आहे. या उपोषणाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा आणि वन अधिकारी करमाळा यांना देखील देण्यात आली आहे.

गावाच्या मूलभूत प्रश्नासाठी सुरू झालेल्या या उपोषणाकडे आता प्रशासन कसे पाहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *