June 24, 2026
IMG-20260623-WA0026

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे )

करमाळा-माढा मतदारसंघातील कंदर-केम-रोपळे-कन्हेरगाव या 25 किमी रस्त्यासाठी एडीबी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या 200 कोटींच्या निधीवरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. आमदार नारायण आबा पाटील आणि भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल या दोघांनीही या निधीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे.गेल्या 5 वर्षांपासून उखडलेल्या या प्रजिमा-12 रस्त्यामुळे केम, कंदर, रोपळे, कन्हेरगाव परिसरातील नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. या रस्त्यासाठी 200 कोटी मंजूर झाल्याची बातमी समोर येताच दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र निवेदने प्रसिद्ध करून याचे श्रेय आपल्याकडे घेतले.

आ.पाटील यांचा दावा
आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान केम गटातील नागरिकांना हा रस्ता 100% करून देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि ADB योजनेतून 200 कोटी मंजूर करून आणले.

रश्मी बागल यांचा दावा-

दुसरीकडे भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनीही प्रसिद्धी पत्रक काढून सांगितले की, करमाळा-माढा मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रश्नांसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. केम परिसरातील नागरिकांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे त्यांनीही निधीची मागणी लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली, असे त्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे दोन्ही निवेदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केल्याचा उल्लेख आहे. एडीबी योजनेतून निधी मंजूर झाल्याने केम-माढा तालुक्यातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, अशी माहिती दोन्ही बाजूंनी दिली आहे.

राजकारणात विकासकामाचे श्रेय घेण्याची परंपरा जुनी आहे. मात्र कोणत्याही वादापेक्षा गेली 15 वर्षे खड्ड्यात असलेला हा रस्ता आता प्रत्यक्षात होणार, याचा आनंद परिसरातील ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र खरचं कोणी प्रयत्न केला व कोणाच्या शब्दावरून निधी उपलब्ध झाला या विषयी नागरिकांत जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *