करमाळा_चौफेर (केम प्रतिनिधी)
श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केमची विद्यार्थिनी कु. महेक पटेल हिची मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड झाली आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल कॉलेजच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करून ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर यशवंत विद्यार्थिनी कु. महेक पटेल हिची ढोल-ताशाच्या गजरात कॉलेज परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.
या सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजाभवानी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बापूराव पवार’ प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर , प्रा. मालोजी पवार, प्रा. मोहन राठोड हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री माधव बेले हे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना कु. महेक पटेल म्हणाली, “माझ्या या यशामध्ये श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये दररोज राबवत असलेल्या ‘आजची महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान माहिती’ या उपक्रमाचा सिंहाचा वाटा आहे. कॉलेजमधील प्राध्यापकांनी दिलेले प्रोत्साहन आणि घरच्यांचा पाठिंबा यामुळे मला यश मिळाले.”
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बापूराव पवार यांनी श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केम या ठिकाणी राबवत असलेल्या वेगवेगळ्या नवोपक्रमांचे कौतुक केले. “विशेषतः या कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी, दर आठवड्याला राबविणारे नवोपक्रम, लेखन, वाचन, भाषण ही विद्यार्थी व्यक्तिमत्वाची कौशल्ये विद्यार्थी आत्मसात करतात. येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात ही अभिमानाची गोष्ट आहे,” असे ते म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री माधव बेले म्हणाले, “श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास घडत आहे. त्यामुळेच येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत.”

या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. डॉ. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. एस. के. पाटील, प्रा. सतीश बनसोडे यांनी विशेष सहकार्य केले.

—
