April 14, 2026
IMG-20260414-WA0013

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)

दत्तकला शिक्षक संस्थेमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक आणि सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. समाजातील अन्याय, अंधश्रद्धा, जातिभेद आणि स्त्री-पुरुष असमानतेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सर्वांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रा. रामदासजी झोळ सर, संस्थेच्या सचिवा माननीय सौ. माया रामदास झोळ, मॅनेजिंग डायरेक्टर पृथ्वीराज माया रामदास झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर, सर्व विभागांचे प्राचार्य, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष माननीय प्रा. रामदास झोळ सर यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले. त्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांची ज्योत ही पुढील पिढ्यांपर्यंत सतत प्रज्वलित राहिली पाहिजे.”

तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, आजच्या तरुणांनी फुले यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा. शिक्षण घेत असताना केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणीव, जबाबदारी आणि नैतिक मूल्ये अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. “शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसून समाज घडवण्यासाठी आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमात इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. विद्यार्थ्यांनीही भाषण, मनोगत आणि विविध उपक्रमांद्वारे महात्मा फुले यांना अभिवादन केले.

सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण वातावरण प्रेरणा, सामाजिक बांधिलकी आणि उत्साहाने भारलेले होते.कार्यक्रमाचे नियोजन दत्तकला शिक्षक संस्थेच्या सर्व विभागांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांची जपणूक होऊन त्यांना योग्य दिशा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

एकूणच, महात्मा जोतिराव फुले जयंतीचा हा कार्यक्रम अत्यंत भव्य, प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक वातावरणात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *