करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍🏻)
बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी पत्रकार परिषदेत सुनील तळेकर यांच्यावर वैयक्तिक टीका केल्यानंतर तळेकर यांनी आज एका युट्यूब चॅनल वर मुलाखत देऊन जोरदार पलटवार केला आहे, तळेकर म्हणाले आदिनाथ विषयी तळमळ व्यक्त करणारे “गुळवे कधीच आदिनाथ च्या वार्षिक सभेला उपस्थित नव्हते, बारामती ॲग्रो सोबत आदिनाथचा १५ वर्षांचा करार २५वर्षांचा केला जात असताना गुळवे गप्प का होते? “असा सवाल करत तळेकर यांनी गुळवेंसह आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे व मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांना पुन्हा पुराव्यानिशी घेरले.
“बारामती अग्रो व आदिनाथ यात गुळवे यांनी
नेहमीच ॲग्रोला ढळते माप दिले.” आदिनाथसह -मकाई देखील बंद पडावा, व पश्चिम भागातील शेतकरी माझ्यावर म्हणजे बारामती ॲग्रोवर अवलंबून रहावा, हीच गुळवे यांची मुळ वृत्ती आहे.” आदिनाथबाबत गुळवेंची तळमळ म्हणजे पुतना मावशीचा पान्हा आहे. वरून माया, आतून विष असा हल्लाबोल तळेकर यांनी केला.
गुळवेंना रावणासारखा अहंकार आला आहे. त्यांनी माझी लायकी काढली, मी कोण आहे हे विचारले.” यांच्या माहितीकरता सांगतो : मी आदर्श अशा भारत शिक्षण संस्थेचा संचालक आहे.” १२ वर्षांपूर्वी अवघ्या २२०० रुपयांत वांगी गणातून माझी पत्नी पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाली आहे.” करमाळा तालुका विकास आघाडी या निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या पक्षाचा मी सचिव असून या पक्षाचे २ जिल्हा परिषद सदस्य, ४पंचायत समिती सदस्य व तालुक्यात ५२ हजार मतदार आहेत.”
या उलट “गुळवे हे बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या नंतरचे व्हा. चेअरमन पद माझ्याकडे असल्याची टिमकी वाजवत फिरतात.” वास्तविक ते संपूर्ण कंपनीचे व्हा. चेअरमन नाहीत, ते एका युनिटचे व्हा. चेअरमन आहेत. आणि करमाळा भागातील ऊस गाळपास नेण्या पुरतीच त्यांची जबाबदारी आहे.” मात्र ते लोकांपुढे वेगळं भासवतात. त्यामुळेच गुळवे कोण आहेत हे आम्ही सुद्धा विचारू शकतो, पण माझे संतुलन शाबूत आहे.”असे देखील तळेकर म्हणाले
“गुळवे मला भंकस म्हणाले, पण माझ्या आरोपांना ते अर्धा तास उत्तर देत होते.””उत्तर देताना त्यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळले होते. शिवीगाळ करण्याची मानसिकता त्यांची झाली होती, कारण मी वेळोवेळी त्यांना पुराव्यानिशी उघडं पाडत आलो आहे. मी पुराव्यासह आरोप केले आहेत. हिम्मत असेल तर समोरासमोर डिबेट करा.”असे आव्हान तळेकरांनी गुळवें यांना दिले आहे.
“मकाईचे चेअरमन भांडवलकर यांनी १४० कोटींचा हिशोब सभासदांसमोर मांडावा. कामगारांच्या किती पगारी दिल्या ते सांगावे.” “आदिनाथ-मकाई दोन वेगळ्या संस्था आहेत. मग आदिनाथ मधून १ कोटी रुपये मकाईच्या खात्यावर वर्ग का केले ? व ते कुठे खर्च केले?, याचे उत्तर डोंगरे व भांडवलकर यांनी द्यावे.” तसेच कमलाई शुगरने आदिनाथला कशासाठी दहा लाख रुपये दिले, हे जाहीर करावे.”असे तळेकर म्हणाले आहेत.
दुर्दैवाने आदिनाथ कारखाना कोणी विकत घेतला व खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला तर आदिनाथसाठी रक्त सांडू.”पण आदिनाथ शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा,व तो सहकार तत्वावरच चालावा यासाठी शेवटपर्यंत लढू, मोठे जनआंदोलन उभा करू असा गर्भित इशारा देखील या मुलाखतींतून तळेकर यांनी विरोधकांना दिला आहे
