करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्यातील विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना बदनाम करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पुरस्कृत “स्पॉन्सर आंदोलनाचा फार्स” सुरू असल्याचा आरोप पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना तळेकर म्हणाले, “करमाळा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. विरोधी बाकावर असतानाही त्यांनी वैयक्तिक संबंधांच्या जोरावर सत्ताधाऱ्यांकडून विकासासाठी निधी खेचून आणला आहे. ही गोष्ट विरोधकांना पचत नसल्याने विविध आंदोलनांच्या माध्यमातून आमदारांना बदनाम करण्याचा उद्योग सुरू आहे.”
तळेकर पुढे म्हणाले, “माजी आमदार संजयमामा शिंदे हे स्वतः पुढे न येता पडद्याआडून विविध आंदोलनांना खतपाणी घालत आहेत. तालुक्याचे राजकीय वातावरण दूषित करून आमदार नारायण पाटील यांच्या हाती असलेल्या विकासकामांना खीळ घालण्याचा हा डाव आहे. खरे तर त्यांनीच रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे होते.”
पाटबंधारे विभागाने गाळपेर जमिनींना नोटीसा काढल्या तेव्हा आमदार आबा पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करून ती प्रक्रिया थांबवली. याच मुद्द्यावर पश्चिम भागातील शिंदे समर्थकांनी फक्त आबांना टार्गेट करणाऱ्या सभा घेतल्या. पण प्रश्न सुटताच ती मंडळी गायब झाली. महायुती सत्तेत असतानाही काही कार्यकर्ते केवळ संजयमामांच्या इशाऱ्यावर रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते.
मांगी तलावातून पाणी नेण्यास पहिला विरोध आमदार नारायण आबा पाटील यांनीच केला होता. तरीही त्या आंदोलनात फक्त आबांवर टीका करण्याचे काम शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
आदिनाथच्या लिलावाला आबांनी य तीन वेळा विरोध करून स्थगिती मिळवली. संचालक व कामगारही कोर्टात गेले आहेत. “आदिनाथ विकला जाईल” हे संजयमामांचे भाकीत खरे ठरवण्यासाठी आता मुद्दाम आंदोलने केली जात आहेत, असा आरोप देखील तळेकरांनी केला आहे.
“आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या दीड वर्षात करमाळा मतदारसंघासाठी तब्बल 400 कोटी रुपयांचा निधी आला आहे. वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अतिवृष्टी व अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आबा स्वतः भेट देऊन शासकीय मदत मिळवून देत आहेत. कुकडी, दहिगाव, सीना-माढा, बोगदा आणि मांगी तलावातून पाणी आवर्तन सुरळीत सुरू आहे. आमसभा व आढावा बैठकांमधून जनतेचे प्रश्न थेट सोडवले जात आहेत,” असे तळेकर यांनी सांगितले.
शेवटी तळेकर म्हणाले, “या स्पॉन्सर आंदोलनांचा करमाळ्याच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही.आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वात विकासाचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.”
