राजकारणात विजय आणि पराभव हे तात्पुरते असतात; मात्र जनतेचा विश्वास कायम राखणारा नेता पुन्हा उभारी घेतो, असे म्हटले जाते. करमाळा मतदारसंघातील माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर या उक्तीची प्रचिती येते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभव आणि त्यानंतर झालेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल, अशी चर्चा विरोधकांकडून रंगविण्यात आली. मात्र त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी हे सर्व अंदाज फोल ठरवले.
करमाळा जिल्हा परिषद निवडणुकीत संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २ जिल्हा परिषद सदस्य आणि ४ पंचायत समिती सदस्य विजयी झाले. माढा तालुक्यातही त्यांच्या गटाने २ जिल्हा परिषद सदस्य आणि ४ पंचायत समिती सदस्य निवडून आणले. त्यानंतर कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत तब्बल १३ नगरसेवक विजयी होत नेतृत्वावरील जनतेचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेल्याची चर्चा करणाऱ्यांना जनतेनेच उत्तर दिले.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येऊन मोर्चेबांधणी केली. तरीही तीन गटांच्या एकत्रित मतांमध्ये आणि संजयमामा शिंदे यांच्या पॅनेलच्या मतांमध्ये अवघा ८ टक्क्यांचा फरक राहिला. ४३ टक्के मते मिळवत त्यांनी आपला जनाधार कायम असल्याचे सिद्ध केले.
निवडणुकीनंतर त्यांनी राजकीय वादात न अडकता विकासकामांचा वेग वाढविण्यावर भर दिला. विरोधकांनी “३५४० कोटी रुपयांचा विकास केवळ कागदोपत्री आहे” अशी टीका केली; परंतु आज मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रस्ते, पूल, पाणीपुरवठा, आरोग्य, वीज आणि इतर विकासकामे प्रत्यक्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांनी “कागदोपत्री म्हणालेला विकास आता प्रत्यक्ष गावात दिसतो आहे” अशा आशयाचे फलक लावून टीकेला प्रत्यक्ष कामातून उत्तर दिले.
संजयमामा शिंदे यांच्या आमदारकीच्या काळात सुमारे ३५४० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली. रस्ते व पुलांसाठी ५० कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध झाला. उजनी धरणावरील डिकसळ पूल, पोमलवाडी–गंगावळण पूल, कुगाव–शिरसोडी पूल, सावडी–वेणेगाव रस्ता तसेच जातेगाव–टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मतदारसंघातील दळणवळणाच्या सुविधांना मोठी चालना मिळाली.
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत १०४ गावांसाठी निधी उपलब्ध झाला. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामांसाठी ११६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या योजनेमुळे पूर्व भागातील अनेक गावांमध्ये केळी, ऊस, फळबागा आणि भाजीपाला क्षेत्रात वाढ झाली. बंद नलिका वितरण प्रणालीमुळे भविष्यात आणखी १४ गावांना सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. कुकडी प्रकल्पातील करमाळा तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत उजनी–कुकडी उपसा सिंचन योजनेचा ४२४ कोटी रुपयांचा आराखडाही पुढे नेण्यात आला.
वीज क्षेत्रात आवाटी, राजुरी आणि रायगाव येथे नवीन उपकेंद्रे सुरू करण्यात आली, तर अनेक उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यात आली. आरोग्य क्षेत्रात करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन, ट्रॉमा केअर, ऑक्सिजन प्लांट, डिजिटल एक्स-रे, सिझेरियन सुविधा आणि विविध शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध झाल्या.
शहर विकासाच्या दृष्टीने नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक सभागृह, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण, वरिष्ठ स्तर न्यायालय, प्रशासकीय संकुल, दुय्यम निबंधक कार्यालय तसेच शेलगाव–वांगी येथील केळी संशोधन केंद्रासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आमदार निधी, जिल्हा नियोजन, समाजकल्याण, दलित वस्ती, अल्पसंख्याक, क्रीडा आणि पुनर्वसन विभागांच्या माध्यमातूनही विविध विकासकामे मतदारसंघात राबविण्यात आली.
आज सुरू असलेली विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यश, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेशी सातत्याने असलेला संपर्क यामुळे संजयमामा शिंदे यांचे राजकीय स्थान पुन्हा मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रतिटीका करण्यापेक्षा विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
मितभाषी,हजर जवाबी ,कामाचा प्रचंड उरक ,प्रशानावरील पकड असलेले मामा सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा करमाळा विधानसभेवर विजयी झेंडा फडकवतील या बाबत तिळ मात्र शंका नाही.
आई कमला भवानी आमच्या लाडक्या नेतृत्वास उदंड आयुष्य देवो हिच मनोकामना.– डॉ. विकास वीर
