April 15, 2026
IMG-20260415-WA0024(1)

करमाळा_चौफेर शंभू फरतडे ✍️

करमाळा तालुक्यात  इंटरनेट केबल साठी नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या साईडपट्टी खोदाईमुळे गंभीर जखमी झालेल्या अ‍ॅड. बालाजी इंगळे यांच्यासाठी   मकाई चे संचालक सतीश निळ यांच्या पाठोपाठ अ‍ॅड. विशाल घोलप यांनी ठाम भुमिका घेतली असून  या अपघात प्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करून अ‍ॅड. ईंगळे यांच्यावर झालेल्या उपचाराचा सर्व खर्च वसूल करण्याची मागणी  घोलप यांनी केली आहे.

अ‍ॅड. विशाल घोलप यांनी बांधकाम विभागाकडे नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले इंटरनेट केबल साठी साईडपट्टी खोदाईचे काम त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा संबंधित विभागाकडून व ठेकेदाराकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कामांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, वेळप्रसंगी जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

संबंधित कंपनीस कोणत्या अटीवरुन परवानगी दिली आहे, या परवानग्याचे पालन करून काम सुरू आहे का हे पहाणे संबंधित विभागाचे काम असून तक्रारी आल्यानंतरच व दुर्घटनेनंतर प्रशासन जागे होत असेल तर हे दुर्दैव असल्याचे घोलप यांनी म्हटले असून सदर घटनेचा बांधकाम विभागाने तात्काळ पंचनमा करावा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करावी असे देखील घोलप यांनी म्हटले आहे.

करमाळा चौफेर’ने आधीच दिला होता इशारा

करमाळा चौफेर’च्या वतीने या बेकायदेशीर कामाबाबत वारंवार आवाज उठवून या नियमबाह्य कामामुळे निष्पाप लोकांचा बळी जाऊ शकतो, असे अनेक वेळा निदर्शनास आणून दिले होते. तसेच विविध वर्तमानपत्रात देखील या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. वेळीच दखल घेतली असती तर ही दुर्घटना घडलीच नसती, अशी भावना आता व्यक्त होत आहे.

भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी या मुजोर कंपनीवर वेळीच कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून देखील आता या बेजबाबदार कामाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *