करमाळा चौफेर (शंभू फरतडे )
बारामती ॲग्रो व्हा चेअरमन सुभाष गुळवे यांनी आज करमाळ्यातील स्थानिक पत्रकारांना मुलाखती दिल्या. जवळपास अर्धा तास चाललेल्या या मुलाखतीत गुळवे यांनी पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांच्या आरोपांना आक्रमक भाषेत उत्तरे दिली. आदिनाथ, डिकसळ पूल व तालुक्यातील विकास निधी यावर देखील त्यांनी परखड मते व्यक्त केली. सुभाष गुळवे आपल्या मुलाखतींतून नेमकं काय म्हणाले याचा मुद्देसूद सविस्तर आढावा
●आदिनाथ विषयी गुळवे यांचे मत●
आदिनाथबाबत आम्ही चांगली भूमिका घेतली. 25 वर्षाच्या करारावर आम्ही (बारामती ॲग्रोने )घेतला होता. मात्र हस्तांतर प्रक्रियेत कुणी कुणी आडथळा आणला, व खिळ घालण्याचे काम केले हे जगजाहीर आहे,यांच्यामुळेच आदिनाथ लिलावाच्या उंबरठ्यावर आहे. आज ना उद्या आदिनाथचा लिलाव होणारच आहे हे तालुक्याचे दुर्दैव आहे.
पाठीमागे कुणी काय केले हे महत्वाचे नाही मात्र कारखान्याची बहुमताने सत्ता, चेअरमन, आमदारकी असताना व निवडणूक काळात सोन्याचा धूर काढू, विकास करू, अशा वल्गना केल्यानंतर देखील आदिनाथ सुरू करू शकत नाहीत व त्यांच्याच नेतृत्वाखाली हा कारखाना लिलावात निघतो व ज्या गोविंद बापूंनी पायात चप्पल न घालता कारखाना उभारणीसाठी कष्ट घेतले, तीस हजार लोकांनी योगदान दिले, त्या सर्वांच्या स्वप्नांचा पाटील गटाने चुराडा केला आहे.
तुमचे हितसंबंध, राजकीय संबंध वापरून कारखान्याचे खासगीकरण, लिलाव प्रक्रिया टाळून कारखाना शेतकऱ्यांचा राखा आज ही तुमचे धन्यवाद मानायला तयार आहोत. तुम्ही यात यशस्वी झाला तर, बारामती ॲग्रोचा कोर्टातील दावा मागे घेऊन आमदार नारायण पाटील यांना सहकार्य करू.
आदिनाथचा लिलाव मुख्यमंत्र्यांनी नाही ,तर बारामती ॲग्रो व MSC बँक कोर्टात गेल्याने मिळाला आहे, 16 तारखेपर्यंत हा स्टे राहील मात्र भविष्यात तो राहील का नाही सांगता येत नाही.
“बागल शिंदे डिलचा आरोप धादांत खोटा” : गुळवेंचा खुलासा
बागल व संजय मामा शिंदे यांच्यात बारामती ॲग्रो करारा वरून डिल झाली असून आदिनाथचे संचालक मंडळास कोर्टात लावण्यासाठी शिंदेंनी मदत केल्याचा तळेकर यांचा आरोप धादांत खोटा असून बागल यांनी बारामती ॲग्रोला सहकार्य केले. बारामती ॲग्रोकडे अधिकृत ताबा नसल्याने दोन वर्षे चालू करता आला नाही. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करून आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोच्या ताब्यात घेण्यासाठी गेलो असता नारायण पाटील यांनी दमबाजी केली, हुसकावून लावले. आदिनाथचे बारामतीकडे हस्तांतरण रोखणे हा आदिनाथच्या इतिहासातील काळा दिवस आहे. याच दिवसापासून आदिनाथची उतरती कळा सुरू झाली.,नंतर यांनीच सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांना मोळी टाकण्यास आणले, कारखाना बंद पडू देणार नाही म्हणाले. नंतर पाटील यांनी निवडणुकीत कारखाना जिंकला ‘प्रचारात सोन्याचा धूर काढू म्हणाले, आदिनाथ नाही सुरू झाला तर कोणतीच निवडणूक लढवणार नाही’ म्हणाले, मात्र आमदार पाटील व त्यांची टीम अपयशी ठरली. कारखाना सुरू ठेवला असता तर लोण मिळाले असते परंतु त्यांनी तो बंद ठेवला. ज्या दिवशी आदिनाथचे बारामती ॲग्रोकडे हस्तांतरण होणार होते त्या दिवशी, एनसीडीसीचे 42 कोटी कर्ज होते तर 60 कोटी MSC बँकेचे कर्ज होते आज MSC बँक 110 कोटींवर गेली NCDC बँक 85 कोटींवर गेली. याला नारायण पाटील जबाबदार आहेत. जेव्हा आदिनाथ चांगल्या वळणावर आला त्या -त्या वेळेस नारायण पाटील हेच आडवे गेले आहेत हा इतिहास असल्याचे देखील गुळवे म्हणाले आहेत.
“बागल जबाबदार नाहीत, अपयश झाकण्यासाठी टीका”
बागल गटाच्या ताब्यातून सहा वर्षांपूर्वी कारखाना गेला, प्रशासक होता, मग अधोगतीला बागल गट जबाबदार म्हणता येणार नाही. बागल जबाबदार होते, तर प्रचारात बागलांवर आरोप का केले नाहीत? त्यांच्या पाठिंब्यावर सत्ता मिळवली. आज स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बागलांवर टीका केली जात आहे असे सांगून बागलांचे समर्थन केले, आदिनाथच्या निवडणुकीत रोहित पवार यांचे विरोधक राम शिंदे यांचे खंदे समर्थक यांना उमेदवारी दिली, आम्ही तुमच्या विचाराला बांधील नाही हे नारायण पाटील यांनी पवारांना दाखवून दिले असल्याचे देखील गुळवे म्हणाले.
●सुनील तळेकरांवर आक्रमक टीका●
सुनील तळेकर यांच्या आरोपांविषयी विचारताच गुळवे यांचा पारा चढला. आपली सर्व भडास त्यांनी तळेकर यांच्यावर काढलेली दिसली. गुळवे म्हणाले, “तळेकर याचा पगार किती, आपण बोलतो किती? आपली लायकी काय? तो प्रवक्ता आहे? कोण म्हणतं तो अनाउंसिंग करतो, सूत्रसंचालन करतो असल्या भंकस लोकांवर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. सुनील तळेकर असं विश्लेषण करतोय की जणू काही तालुक्याचा आख्खा अभ्यास याच्याकडेच आहे. मला तर वाटतं पुढच्या विधानसभेस नारायण पाटील यांच्या ऐवजी सुनील तळेकर याचाच फॉर्म भरत्यात का काय कोणास ठाऊक, असंच चालू राहिलं तर कठीण आहे. अशी मूर्ख लोकं बोलतायत ज्याची लायकी नाही, पायातले वाहन पायात ठेवले पाहिजे, नारायण पाटील यांना सुद्धा कोणाला किती महत्व द्यायचं हे कळायला पाहिजे, काय अक्कल आहे तळेकरला, आमदाराच्या मागे कागदं घेऊन पळण्याचे काम करावे, काय बरळायचे बरळू द्या” अशा शब्दांत तळेकर यांच्यावर टीका केली.
“डिकसळ पुलाचे श्रेय घेण्याचा नैतिक अधिकार नाही!”
नारायण पाटील यांनी डिकसळ पुलाविषयी एक तरी बैठक घेतली का? घेतली असेल तर पुरावे द्यावेत. पाहणी करण्यास आले तेव्हा कंबरेवर हात ठेवून उभे राहिले व निघून गेले. आम्ही लोकवर्गणी करून काही काम केले. संजयमामा शिंदे यांनी सुप्रमा आणून डिझाईन चेंज करून घेतले व कुगावच्या धर्तीवर आता पाण्यात देखील काम सुरू राहू शकते. स्व. अजितदादांच्या सहकार्याने व संजयमामा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतून डिकसळ पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. याचे श्रेय फक्त संजयमामा शिंदे यांचे आहे. नारायण पाटील यांना श्रेय घेण्याचा नैतिक अधिकार नाही असे गुळवे यांनी सुनावले.
●नारायण पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका●
विकास कामात आमदार नारायण पाटील निष्क्रिय आहेत. शरद पवार यांनी तिकीट दिले, रोहित पवार यांनी सहकार्य केले, मदत केली, आम्ही देखील योगदान दिले, मात्र स्वार्थासाठी जयवंतराव जगताप, मोहिते-पाटील यांचा विश्वासघात केला. सर्व बाबींवर ते अपयशी ठरले. आज आमदार असून यांना आंदोलन करावे लागत आहे. आयते श्रेय घेण्याचा आमदार पाटील प्रयत्न करतात. आज आमदार नसताना लोकं संजयमामांना बोलावतात यावरून सगळं दिसतंय. संजयमामा नारायण पाटील यांची तुलना करायचीच झाली तर दहिगाव असेल, आरोग्य असेल किंवा इतर विभागाचे कामकाज बघा संजयमामाच नारायण पाटील यांना सरस ठरले आहेत, असा हल्लाबोल देखील शेवटी गुळवे यांनी केला आहे.
●तळेकरांच्या भूमिकेकडे तातालुक्याचे लक्ष ●
सुभाष गुळवे यांनी तळेकर यांच्यावर टीका केली. मी असल्या भंकस माणसाला महत्त्व देत नाही म्हणाले परंतु जवळपास तीस मिनिटे गुळवे यांनी तळेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरवरच आख्खी मुलाखत दिली कारण गुळवे यांनी तळेकर यांच्या बातम्यांनाच उत्तरे दिलेली दिसून आली. आदिनाथ बाबत अजुन एकदाही आमदार नारायण आबा पाटील यांनी वक्तव्य केले नाही.मात्र तळेकर यांची टिका बागल गटासह गुळवे यांना देखील वर्मी बसल्याचे दिसून आले. गुळवे यांनी या पूर्वी देखील नारायण पाटील यांच्यावर अरे-तुरे व आक्रमक टीका केली आहे. आज पुन्हा एकदा गुळवे यांनी आक्रमक भाषेत पाटील गट व प्रवक्ते यांच्या आरोपांचे पोस्टमार्टेम केले आहे. गुळवे यांच्या स्फोटक मुलाखतीस प्रवक्ते सुनील तळेकर हे काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे
