June 6, 2026
IMG-20260606-WA0032

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍🏻)

करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील हे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीपासून पक्षाशी फारकत घेऊन होते. त्यांनी तुतारी चिन्हाऐवजी स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यांचे दोन जिल्हा परिषद सदस्य व चार पंचायत समिती सदस्य विजयी झाले आहेत.

आदिनाथ कारखान्याचा लिलाव रद्द करून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोहिते-पाटील यांची मैत्री सोडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी सलगी वाढवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यादेखील भेटीगाठी वाढल्या होत्या. तसेच नुकताच विधान परिषद उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरताना देखील आमदार नारायण पाटील यांची आवर्जून उपस्थिती होती.विरोधी पक्षाचे आमदार असून देखील आदिनाथसाठी सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्यात प्रयत्नशील असलेले नारायण पाटील सध्या अचानक सरकारविरोधी सूर आळवताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या वीज समस्यांचे निमित्त करून उद्या जनआक्रोश मोर्चाचे नियोजन केले आहे.विधानपरिषद भूमिकेबाबत एका दैनिकात “मी आमच्या पक्षाच्याच नेतृत्वाला बांधील आहे मात्र उमेदवार ठरवताना विचारात घेतले नसल्याचे” सांगून “अजून कोणताच निर्णय घेतला नसल्याचे” सांगून सस्पेन्स निर्माण केला आहे.नारायण पाटील यांचे फक्त दोन जिल्हा परिषद सदस्य असले तरी आमदार नारायण पाटील यांना मानणारे अनेक मतदार जिल्ह्यात आहेत. आदिनाथबाबत सत्ताधाऱ्यांकडून ठोस निर्णय होत नसल्याने नारायण पाटील नाराज असल्याची चर्चा असून त्या नाराजीतूनच आबांनी हे विधान केले असल्याची चर्चा आहे. विधानपरिषद निवडणुकीत आमदार नारायण आबा नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *