June 5, 2026
IMG-20260605-WA0031

करमाळा_चौफेर शंभू फरतडे✍🏻

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वादात आज बागल गटाने प्रथमच मौन सोडले आहे. नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केलेल्या सलग आरोपांनंतर आज बागल गटाने पत्रकार परिषद घेत आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे यांच्यामार्फत जोरदार पलटवार केला. “कारखाना सुरू करण्यास अपयशी ठरलो असे कबूल करा, नंतर बागलांचे नाव घ्या असा सणसणीत टोला डोंगरेंनी तळेकरांना लगावला.तळेकरांनी बागल व शिंदे यांनी मिळून आदिनाथ अडचणीत आणला, रोहित पवार व दिग्विजय बागल यांच्यात खडाजंगी झाली असे सांगून खळबळ उडवून दिली होती. मात्र आजपर्यंत बागल गटाकडून उत्तर देणे टाळले जात होते. आजच्या पत्रकार परिषदेत स्वतः दिग्विजय बागल उत्तर देतील अशी अपेक्षा होती, मात्र चेअरमन धनंजय डोंगरे यांनी उत्तरे दिली.“सभासदांनी विश्वास टाकून ‘आदिनाथ’ नारायण पाटील यांच्या ताब्यात दिला. नारायण पाटील स्वतः चेअरमन आहेत, विद्यमान आमदार आहेत. वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून आदिनाथ सुरू करण्याचा सल्ला देण्याऐवजी प्रवक्ते सुनील तळेकर यांनी विनाकारण बागल कुटुंबावर टीका करण्यात वेळ घालू नये” असा टोला डोंगरेंनी लगावला.“आदिनाथ बागलांच्या ताब्यात आला तेव्हा जीवाचे रान करून सुरू केला, कामगारांच्या तीन पगारी दिल्या, उस उत्पादक शेतकऱ्यांची पेमेंट केले. गाळप करून बंद केलेला आदिनाथ नारायण पाटलांच्या ताब्यात आल्यानंतर सुरू का झाला नाही? आपण सोन्याचा धूर काढण्याचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात मात्र एक मोळी सुद्धा गाळप का करू शकलो नाही? याचे आत्मपरीक्षण करावे” असे डोंगरे म्हणाले.

“आदिनाथ सुरू करण्यासाठी आम्ही व आमचे नेते दिग्विजय बागल व रश्मीदिदी  बागल आजही सकारात्मक आहोत. आम्ही आदिनाथ बाबत आजपर्यंत कुरघोडीचे राजकारण केलेले नाही. तुम्ही देखील टीका करण्यापेक्षा आदिनाथ सुरू करण्यासाठी प्रयत्न करा व ‘जमत नसेल तर कारखाना सुरू करण्यास अपयशी ठरलो असे कबूल करा'” असे आवाहन डोंगरेंनी तळेकरांना दिले.“मकाईसाठी आदिनाथचा बळी दिला” या तळेकरांच्या आरोपाचे मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी खंडन केले. “मकाईला आलेले १४० कोटी शासनाच्याच सूचनेनुसार योग्य पद्धतीने वापरले असून या गाळप हंगामात स्वबळावर आम्ही मकाई सुरू करू” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

●बागलांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आदिनाथ मुद्द्यावरून विसंवाद दिसून आला.●

●चेअरमन डोंगरे म्हणाले, “आम्ही आदिनाथमधून सोन्याचा धूर काढण्यासाठी पाटील यांना पाठिंबा दिला”,तर चिंतामणी जगताप यांनी “बागलांनी तटस्थ भूमिका घेतली, आबांना पाठिंबा नव्हता” असे सांगितले.  मकाईचे संचालक सतीश बापू निळ यांनी दोन्ही चेअरमन यांच्या गुळगुळीत उत्तरांवर नाराजी व्यक्त केली. “आपल्या नेत्यांवर थेट टीका होत असताना तुम्ही नरमाईचे धोरण का घेता? कारखान्यांची पाटील समर्थकांकडे किती कोटींची देणी आहेत, कामगारांना कोणी भडकवले, पैसे देऊन आंदोलने कुणाला करायला लावली याचा जाब प्रवक्त्यांना विचारा” असा आक्रमक सूर त्यांनी धरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *