June 6, 2026
IMG-20260606-WA0022(1)

करमाळा_चौफेर

आदिनाथ कारखान्याच्या विषयावर सध्या पाटील व बागल गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल बागल गटाच्या वतीने माजी चेअरमन धनंजय डोंगरे व मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी एका पत्रकार परिषदेत आमदार नारायण आबा पाटील यांच्यावर टीका केली. या टीकेला पाटील गटाकडून उत्तर देताना गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की, बागल गटाची काल झालेली पत्रकार परिषद ही मुळ विषयाला सोडून झाली. वास्तविक पाहता आदिनाथ कारखान्याच्या मागील सतरा वर्षाच्या कारभारावर यात लेखाजोखा मांडला जाईल अशी अपेक्षा असताना त्यावर कोणीही बोलले नाही. आदिनाथवर कर्जाचा डोंगर उभारण्यात डोंगरे यांचेही शेवटी का होईना योगदान राहिले आहे. आदिनाथ कारखाना व बारामती ॲग्रो यांच्यातील करार पंधरा वर्षांवरून पंचवीस वर्षांवर का करण्यात आला? बारामती ॲग्रोबरोबर भाडेपट्टी करार झाला असतानाही त्या विरोधात बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी आदिनाथवरील आपल्या संचालक मंडळास कोर्टात का लावले? या दोन प्रश्नांची उत्तरे काल माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली नाहीत.तर मकाई कारखान्यास १४० कोटी रुपये निधी मिळूनही एक गाळप हंगाम का झाला नाही? जर साखर आयुक्तांना १४० कोटीच्या खर्चाचा तपशील दिला जात असेल तर मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी तो एकदाही सभासदांच्या समोर अथवा प्रसिद्धी माध्यमांच्या समोर येऊन सार्वजनिक का केला नाही? आदिनाथच्या खात्यामधून दिनांक ५ मार्च २०२२ रोजी मकाई कारखान्यासाठी १ कोटी ६० लाख ६५ रुपयांची रक्कम आरटीजीएस (चेक क्रमांक ४०१३) करण्यात आली का? जर आली असेल तर मकाईस ही रक्कम देण्याचे कारण काय? याबाबत आदिनाथ व मकाईच्या बागल गटाच्या दोन्ही चेअरमन यांनी खुलासा करावा.आमदार नारायण आबा पाटील हे आदिनाथ कारखान्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी सत्ताधारी नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री याबाबत सकारात्मक असतानाच भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व बागल गटाच्या नेत्या तथा सोलापूर जिल्हा परिषद गटनेत्या रश्मीदिदी बागल ह्यांनी आदिनाथ कारखान्यास अगोदर मदत केली तर याचा परिणाम मकाईवर होऊन बागल गटाच्या राजकारणावरही होणार हे ओळखून भाजपाच्या संघटनात्मक कार्यकारिणी मधील वरिष्ठ नेतृत्वांकडे आदिनाथ कारखान्यास अगोदर आर्थिक मदत देऊ नये असे सांगितले. याउलट मकाई कारखान्यासाठी १४० कोटी रुपये मिळाले असले तरी मदतीचे आणखी एक पॅकेज अगोदर देण्यात यावे व आदिनाथचा मदतीचा प्रस्ताव बाजूला सारला जावा यासाठी यशस्वी प्रयत्न केला.आदिनाथच्या मागील कारभाराबाबत आमनेसामने येऊन डिबेट करण्यासाठी आपण तयार आहोत. बागल गटाचे नेते दिग्विजय बागल व आदिनाथ चेअरमन धनंजय डोंगरे,मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर बाजार समिती चे माजी उप सभापती चिंतामणी दादा जगताप यांनी वेळ व ठिकाण ठरवावे असे सांगून पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बागल गटाचे आव्हान स्वीकारल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *