करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील ‘लाईफलाईन’ मानल्या जाणाऱ्या डिकसळ ते कोंढारचिंचोली दरम्यानच्या 55 कोटींच्या नवीन पुलाच्या श्रेयावरून तालुक्यातील राजकारण तापले आहे. कोर्टी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. वनिता सुभाष गुळवे यांनी विद्यमान आमदार व पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांना थेट आव्हान देत “दोन वर्षात किती विकासकामे मंजूर केली, याचा हिशोब जनतेसमोर मांडा” अशी मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष तथा माजी जि.प. उपाध्यक्ष सुभाष ‘आबा’ गुळवे यांनी डिकसळ-कोंढारचिंचोली पुलाच्या कामाची स्थळपाहणी केली होती. त्यावेळी “या पुलाची मंजुरी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनीच आणली” व त्यांच्या सूचनेनुसार पुलाच्या कामाच्या डिझाईन मध्ये बदल झाला असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी या श्रेयवादावर प्रतिक्रिया दिल्याने वादाला तोंड फुटले होते.
तळेकर यानी गुळवे यांच्यावर मार्मिक टिका केल्यानंतर सुभाष गुळवे यांच्या पत्नी जिल्हापरिषद सदस्या सौ वनिता गुळवे यांनी आमदार नारायण पाटील यांच्या सह प्रवक्त्यांना देखील लक्ष केले असून , या नवीन पुलाच्या कामासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलेला होता. त्यांच्याच प्रयत्नांमुळे या पुलासाठी 55 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.” पुढे काही काळ मा. अजितदादा सरकारमधून बाहेर राहिले होते. याच काळाचा गैरफायदा घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कोणी कसे दबाव आणले व काम कोणी प्रलंबित ठेवायला भाग पाडले, याचा सर्व हिशोब करमाळ्याच्या जनतेकडे आहे.” असा सुचक इशारा दिला आहे.
अधिक बोलताना सौ .गुळवे यांनी “चालू दोन वर्षात विद्यमान आमदारांनी किती विकासकामे मंजूर करून आणली आहेत आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात किती कामे मंजूर केली, याचा सर्व लेखाजोखा पाटील गटाने जनतेसमोर मांडला पाहिजे.” असे आव्हान देखील दिले आहे.
आजपर्यंत प्रत्येक विकासात्मक गोष्टींना सोईस्करपणे बगल देण्याचे काम पाटील गटाच्या नेत्यांनी व प्रवक्त्यांनी वारंवार केले आहे, हे जनतेला माहीत असुन “वस्तुस्थितीने नेत्यांनी केलेल्या विकासकामांना तराजूत मोजण्याचे काम जनता करत असते. त्यामुळे विकासकामांच्या तराजूत माजी आमदार संजयमामा शिंदे हेच वजनदार राहतील. आणि डिकसळ-कोंढारचिंचोलीच्या पुलाचे श्रेय त्यांचेच आहे.” असा पुनरुच्चार देखील सौ गुळवे यांनी केला आहे.
वनिताताई पुढे म्हणाल्या, “करमाळा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले पाहिजे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तालुक्यासाठी आणलेली कोट्यवधींची मंजूर विकासकामे आता जमिनीवर दिसू लागलेली आहेत. डिकसळ ते कोंढारचिंचोली या महत्त्वाच्या पुलाचे कामही माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याचे यश आहे. ते काम निरंतरपणे चालू राहील यासाठीदेखील प्रशासनाला योग्य त्या सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत. बारामती ॲग्रोनेदेखील या ठिकाणच्या रस्ते व पुलासाठी आवश्यक त्या वेळी सहकार्य केले आहे. येथे साकारणारा नवीन पूल लवकरात लवकर उभारावा अशी जनसामान्यांची भावना आहे,” असेही गुळवे यांनी स्पष्ट केले.
सौ गुळवे यांनी शिंदे व पाटील यांच्या आमदारकीच्या कालावधीत झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्याच्या आव्हानाला पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर किंवा विद्यमान आमदार उत्तर देणार का हे पहावे लागेल. 
