करमाळा_चौफेर (शंभू फरतडे )करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) येथील धरणग्रस्त शेतकरी बांधव गेल्या 27-28 वर्षांपासून भूसंपादन झालेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला मिळावा म्हणून सतीश नीळ यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत होते. या लढ्यास अखेर यश मिळाले असून 9 कोटी 61 लाख 91 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.
भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा व जिल्हा परिषद गट नेत्या रश्मी दिदी बागल यांच्या हस्ते आज उपविभागीय अधिकारी माढा कुर्डुवाडी यांचे प्रतिनिधी तथा तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्याकडे सदर निधीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
हे काम मार्गी लावण्यासाठी रश्मीदिदी बागल, भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांनी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी सोलापूर, पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला होता.
शेतकऱ्यांच्या वतीने कायदेशीर लढा लढताना ॲड. सूर्यकांत सरडे यांनी अत्यंत काळजीपूर्वक लक्ष घालून धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मोलाचे काम केले, असे सांगण्यात आले.यावेळी रश्मीदिदी बागल, ॲड. सूर्यकांत सरडे, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान करून ऋण व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी श्री मकाई सह. साखर कारखाना चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक रामभाऊ हाके, भाजपा मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, नगरसेवक दीपक चव्हाण, विजयराव लावंड व धरणग्रस्त शेतकरी प्रकाश नीळ, आंबऋषी भील, धर्मराज जगताप, लक्ष्मण रोकडे, दत्ता साळुंके, धनंजय नीळ, अतुल नीळ, राजेंद्र भील, विष्णु नीळ, कालिदास नीळ, सोमनाथ जगदाळे, हनुमंत अतकरे, विकास रोकडे, सुदाम साळुंके इत्यादी उपस्थित होते.

गेल्या २७/२८ वर्षा पासून लढा सुरू होता त्यास ग्रामीण विकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल, युवा नेते दिग्विजय भैय्या बागल यांचे मोलाचे सहकार्य व मदत मिळाली असून आमचे कायदेशीर सल्लागार अँड. सूर्यकांत सरडे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व त्यांच्या प्रयत्नांनी यश मिळाले आहे.
सतीश (बापू ) नीळ –
(अध्यक्ष सीना कोळेगाव धरणग्रस्त संघटना)
