April 24, 2026
IMG-20260423-WA0013(1)

       करमाळा_चौफेर

संजयमामा शिंदे गटाचा लेखाजोखा..(शंभू फरतडे ✍️)

संजयमामा शिंदे माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांचे कनिष्ठ चिरंजीव .वडिलांच्या निधना वेळी संजयमामा अवघ्या ९ वर्षाचे होते. जेष्ठ बंधू बबनदादा शिंदे घरातील कर्ते असल्याने सुरवातीला बबनदादांनिच राजकीय धुरा संभाळली .१९९५ ला बबनदादा आमदार झाले. वडिलांच्या राजकीय कारकीर्दीचा फायदा बबनदादांना जास्त झाला. ज्यावेळेस बबनदादा आमदार झाले त्यावेळेस संजयमामा हे निमगाव चे सरपंच होते .सरपंच पदापासून मामांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. सरपंच, सभापती झाले, व नंतर झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत मामांचा धक्कादायक पराभव झाला. या निवडणुकीत संजय घाटनेकर हे विजयी झाले होते. त्यानंतर पुन्हा जिल्हापरिषद निवडणूक जिंकून मामा जिल्हापरिषद उपाध्यक्ष पदावर विराजमान झाले. जिल्हा दुध संघाचे विस वर्ष संचालक व जिल्हा बॅंकेचे चेअरमन पद देखील मामांनी भूषविले आहे.शिंदे बंधू नी सुरवातीला मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले विजयसिंह मोहिते-पाटील व प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे त्यावेळेस जिल्ह्यात वर्चस्व होते.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याशी जास्त जवळीक होती प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची मुलगी ‘धनश्री’ हिच्या नावाने शिंदे बंधुनी फॅब्रीकेशन व्यवसाय हाॅटेल व्यवसाय सुरू केले होते. रणजितसिंह मोहिते-पाटील व संजयमामा याच्या दोस्तीचे बरचे किस्से ऐकायला मिळातात मात्र हळूहळू शिंदे बंधूचे प्रस्थ वाढू लागले व शिंदे बंधू व मोहिते-पाटील यांच्यात दुरावा निर्माण होवू लागला. जिल्हा बॅंकेच्या  चेअरमन  पदावरून वादाची ठिणगी मोहिते-पाटील यांच्या पासून फारकत

जिल्हा बॅंकेच्या चेअरमन निवडीत जेष्ठ संचालकांनी मार्गदर्शक भुमिकेत यावे व नवीन चेहर्‍याना संधी द्यावी अशी चर्चा झाली, व चेअरमन पदासाठी संजयमामा शिंदे यांचे नाव सर्वानुमते पुढे आले. अखेर संजयमामा च्या नावावर शिक्कामोर्तब झाले .निवडी दिवशी अनेक कार्यकर्त्यांच्या गाड्या निमगाव वरून सोलापूर कडे रवाना झाल्या. मात्र अचानक जेष्ठ संचालक दिलीप सोपल यांचीच चेअरमन पदी निवड झाली. कार्यकर्त्यांच्या गाड्या मोहोळ मधून माघारी फिरल्या .मोहिते-पाटील यांनीच डावलले अशी शिंदे बंधूसह कार्यकर्त्यांची धारणा झाली . व इथूनच शिंदे बंधू व मोहिते-पाटील यांच्यात कायमचा दुरावा निर्माण झाला तो आजअखेर कायम राहिला आहे. नंतर दोन वर्षांची मामांनी जिल्हा बॅंकेचे चेअरमन पद मिळवले.“आदिनाथ” साठी पाटील बागल युती घडवली

मोहिते-पाटील विरोधक एकत्र करून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मामांनी प्रयत्न केला या अनुषंगानेच आदिनाथ कारखाना निवडणूकीत पाटील बागल युती घडवून आणली.२०१२ ला संजयमामा शिंदे व दिपक आबा साळुंखे यांनी करमाळ्यात येवून आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाची व नारायण पाटील गटाची युती घडवली व मोहिते-पाटील -जयवंतराव जगताप गटाचा पराभव केला.

२०१४ ला करमाळ्यात एंट्री! विधान सभेत पराभव

२०१२ ला आदिनाथ च्या निवडणूकीत पाटील बागल युती करुन देणारे संजयमामा करमाळ्याची विधान सभा लढवतील अशी कोणतीच शक्यता नव्हती . कुणाच्या ध्यानी मनी नसताना शेवटच्या एक दोन महिन्यात त्यांनी करमाळ्यात चाचपणी करण्यास सुरवात केली . विलासराव घुमरे ,सावंत गट , बदे ,मस्कर, तानाजी झोळ, हि मंडळी मामासोबत होती. विधान सभा निवडणूकीत मामांनी लक्षवेधी मतं घेतली. विशेष म्हणजे या निवडणुकीत बागल गटाकडून संजय शिंदे नावाचे पाच उमेदवार दिले होते यातील एकाचे ‘कुकर’ चिन्ह व मामांचे ‘शिट्टी’ चिन्ह यात बॅलेट पेपर वर बरेच साम्य होते. एकाखाली एक अशी नावे असल्याने जवळपास दोनहजार हुन अधिक मतं संजय शिंदे नावाच्या डमी उमेदवारांनी घेतली त्याचा प्रंचड फटका संजयमामा शिंदे यांना बसला . बागल पाटील यांच्यात काटे ची टक्कर होवून शेवटी नारायण आबा विजयी झाले होते.

  ●विधान सभा पराभव, जिल्हापरिषद ला विजयी व थेट जिल्हापरिषद अध्यक्ष!●

२०१४ ला करमाळा विधान सभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर संजयमामा शिंदे यांनी जिल्हापरिषद निवडणूकीवर लक्ष केंद्रित केले. माढा तालुक्यातील कुर्डू जिल्हापरिषद गटातुन विजयी झाले. मोहिते-पाटील यांचे विरोधक एकत्र करून जिल्ह्याचे नेतृत्व ताब्यात घेण्याचा संजयमामा चा प्रयत्न काही अंशी यशस्वी झाला .महायुतीच्या (फडणवीस )यांच्या सहकार्याने ते जिल्हापरिषद अध्यक्ष झाले .जिल्हापरिषद अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच करमाळा माढा मतदारसंघात विशेष लक्ष दिले व आपला गट , कार्यकर्ते मजबूत केले. याचा त्यांना फायदा झाला.

●२०१९ ला मात्र जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र बदलले!●

२०१९ मध्ये जिल्यात अनेक घडामोडी घडल्या लोकसभा निवडणुकीतून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते , नाराज असलेले व सहकार संस्था अडचणीत असलेले मोहिते-पाटील कुटुंब भाजपा कडे घेण्याचे डावपेच भाजप कडून टाकले गेले व रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबई येथे देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला .रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश करताच भाजप पुरस्कृत जिल्हापरिषद अध्यक्ष असलेले संजयमामा शिंदे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत बारामती येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला . त्यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत भाजपाचे रणजितसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीचे संजयमामा यांच्यात लढत होईल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र संजयमामा शिंदे यांचे खास मित्र व मोहिते-पाटील विरोधी गटातील ओळख असलेले सातारा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपात घेऊन संजयमामा यांच्या विरोधात उतरवण्यात भाजप यशस्वी झाली.मोहिते-पाटील यांच्या सहकार्यातून रणजितसिंह निबांबळकर यांना एक लाखांच्या वर मताधिक्याने विजयी करण्यात फडणवीस यांना यश आले होते. 

●मामा “खासदार’ दिदी ‘आमदार’घोषणा फसली!●

याच निवडणुकीत निवडणुकीत रश्मी बागल यांनी संजयमामांनी विधान सभा निवडणूकीत सहकार्य करण्याच्या शब्दावर संजयमामा ला साथ दिली. “मामा खासदार दिदी आमदार” अशा घोषणा झाल्या मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाल्यानंतर पुन्हा करमाळ्याची समीकरणे बदलली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने व रश्मीदिदी बागल यांना शब्द दिल्याने मामा विधानसभा लढवतील का, नाही ?अशी चर्चा होती .मात्र मामांनी शब्द फिरवला (असे बागल गटाचे म्हणणे आहे) व करमाळ्याची विधासभा अपक्ष म्हणून लढवली. या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने संजयमामाला पाठिंबा दिला होता. जयवंतराव जगताप यांनी पाठिंबा देणाचे नक्की झाल्यावरच बागलांना दिलेला शब्द मामांनी मोडला अशी चर्चा तालुक्यात झाली.या निवडणुकीत जवळपास साडेपाच हजाराच्या मताधिक्याने संजयमामा आमदार म्हणून विजयी झाले. शिवसेनेत गेलेल्या रश्मीदीदी बागल व अपक्ष उमेदवार नारायण आबा पाटील यांचा पराभव झाला.अपक्ष असून देखील नारायण आबा पाटील लक्षणीय मते घेऊन दुसर्‍या क्रमांकावर राहिले.

●आमदारकी नंतर अनेक विकासकामे मार्गी●

२०१९ ला आमदार झाल्यानंतर मामांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेला सुप्रमा मिळवली, हॅम अंतर्गत रस्ते कुगाव ते शिरसोडी या पुल,डिकसळ पुल, मुख्यमंत्री ग्राम सडक ,प्रधानमंत्री ग्राम सडक, नाबार्ड, 30 54 आदी माध्यमातून रस्ते विकासासाठी व पूल बांधणी साठी निधी उपलब्ध केला,उपजिल्हा रुग्णालय, कर्मचारी वसाहत ,प्रशासकीय संकुल, करमाळा नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक भवन, कुर्डूवाडी येथे ट्रामा केअर सेंटर यांची कामे मार्गी लावली आहेत.

●२०२४ च्या पराभवाची कारणं●

सर्वसामान्य कार्यकर्त्यांतशी थेट संपर्क नसणे नडले!

सरपंच पदापासून आमदारकी पर्यंत मजल मारलेल्या मामांना करमाळ्यात मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यां पर्यंत पोहचता आलं नाही. कार्यकर्त्यां ऐवजी गापतळीवरील प्रमुख नेते ठेकेदार यांचाच मामांभोवती गराडा जास्त असायचा.त्यामुळेच गावागाड्यातील कार्यकर्त्यांला मामा पर्यंत पोचता आले नाही.रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठीचे सुत गिरणीत उभारणीचे आश्वासन हवेतच विरले.

आठवड्यातातुन एकदाच करमाळ्याला चक्कर

तालुक्याला पुर्ण वेळ आमदारांची सवय असताना मामां फक्त आठवड्यातातुन एकदाच शुक्रवारी म्हणजे बाजार दिवशी कार्यालयात उपलब्ध असायचे .त्यात बाहेर दौरा असला की अचानक दौरा रद्द, सामान्य लोकांत नाराजी झाली.विरोधाकांनी यावर ‘आठवडी बाजार ‘अशी टिका देखील केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जोर असल्याने सर्व प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांतुन घड्याळ,कमळ ऐवजी अपक्ष लढण्याची सुचना करण्यात आली तसेच राज्यात ऐनवेळेस कोणाला बहुमत कमी पडले तर १९९५ चा पॅटर्न ची पुनरावृत्ती होऊन मंत्रीपद मिळण्याची आशा,एकाच वेळेस ‘फडणवीस’ व ‘अजित दादा ‘यांच्याशी दोस्तांना या बाबी नडल्या. तसेच ओबीसी मराठा वादाचा मोठा फटका मामांना बसला.

पुढची लढाई कठीण

करमाळा मतदार संघाला जोडलेली छत्तीस गावे वगळली तरी करमाळा हिच माझी कर्मभूमी राहणार असून विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार मामांनी केलेला आहे .मात्र पुढची लढाई म्हणावी तेवढी सोपी नाही. कारण सध्या पंचायत समिती जिल्हापरिषद मध्ये बागल संजयमामा शिंदे गटाची युती आहे.बागल गटाचा सभापती आहे.तर जिल्हापरिषद निवडणुकीत रश्मीदीदी बागल विजयी झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे. जेवढा बागल गट जोमात तेवढा शिंदे गटाचा तोटा उघड आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप संजय मामांवर नाराज आहेत. जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूकीत तिन्ही गट एकत्र असून आमदार पाटील यांना झालेले मतदान पहाता पाटील यांची ताकद जास्त आहे. शिंदे बागल किंवा शिंदे जगताप अशी युती असेल तरच विजय शक्य असल्याची चर्चा आहे.त्यामुळे करमाळा तालुक्यात संपर्क वाढवणे गरजेचे आहे, ठेकेदार व ठराविक कार्यकर्त्यां ऐवजी गावपातळीवरील कार्यकर्ता जपला पाहिजे, चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी जवळीक साधावी लागणार आहे .सरपंच ते आमदार हा प्रवास जिद्दीने केला. पराभव पचवून फिनिक्स भरारी घेतली. पण आता काळ बदलला आहे. फक्त ‘संजयमामा’ हे नाव पुरेसे नाही. सोबत कार्यकर्त्यांची फौज, मित्रपक्षांचा पाठिंबा आणि जनतेचा विश्वास या तिन्ही गोष्टी हव्यात. अन्यथा पुढची लढाई नुसती कठीण नाही, तर अशक्यप्राय होईल. कारण करमाळा तालुका कुणाचीही मक्तेदारी मानत नाही. जो जनतेत राहील, तोच विधानभवनात जाईल, हा इथला इतिहास आहे.

●मामांसमोरील  पुढील आव्हाने●

बागल‌ व जगताप या गटांशी युती असल्याने कार्यकर्ते टिकवून ठेवणे हे पहिले आव्हान असणार आहे. तर प्रमुख विरोधी गट म्हणुन सतत आंदोलने व मोर्चे यातुन जनतेच्या महत्वाचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आखणी करणे गरजेचे आहे. केवळ कार्यकर्त्या करवी आंदोलने न करवून घेता स्वतः सहभागी होऊन जनतेचा आवाज होणे महत्वाचे असणार आहे. करमाळा तालुक्यातील गट संघटन मजबुत असल्याने माढा तालुक्यातील छत्तीस गावातील संघटनावर भर‌ देणे मतांच्या टक्केवारीत वाढ होण्यास फायदेशीर ठरेल. प्रसिद्धीमाध्यम , सोशल मिडीया व पत्रकार यांना स्वतः सामोरे जाऊन महिन्यातून एकदाच करमाळ्यात येतात हि इमेज पुसून टाकायला हवी. जगताप व सावंत गट बरोबर आणण्यासाठी आखणी करणे गरजेचे आहे.रिटेवाडी, उजनी, दहिगाव उपसा, रस्ते, वीज, आदिनाथ, मकाई या प्रश्नावर खास नियोजन करुन आवाज उठवावा लागेल. सोलापूर जिल्ह्यातील राजकारणापेक्षा मतदार संघातील राजकारणावर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. आपले प्रमुख विरोधक हे “मोहिते पाटील नसून नारायण पाटील आहेत” असे समजून सतत लोकांच्या चर्चेत राहिले तरच पुढील लढाई सोपी जाणार आहे. बागल गट सुध्दा आता प्रमुख विरोधकांची भुमिका पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याने युतीतही छुप्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. हि आव्हाने पेलण्यासाठी संजयमामा यांचेकडे पाहिजे ती रसद आहे.गरज आहे ती वेळ देण्याची..पुढील अंकात करमाळा नगरपालिकेवर ऐतिहासिक विजय मिळवलेल्या सावंत गटाचा लेखाजोखा प्रकाशित करण्यात येणार आहे.

वाचत रहा करमाळा_चौफेर चौफेर न्युज पोर्टल ✍️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *