करमाळा_चौफेर (केम प्रतिनिधी) संजय जाधव ✍️
करमाळा तालुक्यातील केम येथील पठाराच्या शिवारात बुधवारी, दि. 22 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काढणीला आलेला आंबा आणि उन्हाळी कांदा पूर्णपणे भुईसपाट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी आर्त मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
बुधवारी सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले. सुरुवातीला भोगेवाडी येथे वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली व गारपीट झाली. त्यानंतर हा पाऊस व वादळ केमच्या पठाराच्या शिवारात धडकले. अर्धा तास झालेल्या वादळी वारे व गारपिटीने शिवारात अक्षरशः हाहाकार उडवला.
उत्तरेश्वर सावतीराम तळेकर यांचा दिड एकर आंबा बाग उद्ध्वस्त झाली आंबे काढणीला आले होते, व्यापारी बघून गेले होते. गारपीट व वाऱ्यामुळे सर्व आंबे खाली पडून पसरंग झाली. अंदाजे सात लाखांचे नुकसान. झाले आहे.केमेश्वर सुरवसे यांचा दिड एकर आंबा बाग कोलमडली असून अंदाजे सात लाखांचे नुकसान झाले आहे. पांडुरंग जाधव यांचा एक एकर आंबा बागेचे सहा लाखांचे नुकसान झाले आहे बिभीषण तळेकर यांच्या आंबा बागेचेही मोठे नुकसान झाले आहे.
उन्हाळी कांदा पूर्ण भुईसपाट:
केमेश्वर सुरवसे यांच् दिड एकर कांदा भुईसपाट.अंदाजे सहा लाखांचे नुकसान.संजय जाधव यांचा एक एकर कांदा झोपला असून अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले आहे संतोष तळेकर दिड एकर कांद्याचे नुकसान झाले आहे.उत्तरेश्वर बिचितकर यांचा देखील दिड एकर कांद्याची पसरण झाली आहे व पाच लाखांचे नुकसान झाले आहे भैरवनाथ बिचितकर यांचा एक एकर कांदा वाया गेला असून एक लाखांचे नुकसान झाल आहे
प्रशासन घटनास्थळी, पंचनाम्याचा आदेश नाही
घटनेची माहिती मिळताच कृषी अधिकारी चौधरी व तलाठी आदलिंगे भाऊसाहेब यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, त्यांना पंचनाम्याचे आदेश नसल्याने केवळ पाहणी करून परतावे लागले. 
शेतकऱ्यांचा आक्रोश: ‘तातडीने मदत करा‘
“वर्षभर कष्ट करून पिकवलेला आंबा व कांदा डोळ्यादेखत मातीमोल झाला. बँकेचे कर्ज, खाजगी उसनवारी कशी फेडायची? शासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश देऊन हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी,” अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी उत्तरेश्वर तळेकर, केमेश्वर सुरवसे यांनी केली .
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
केम पठार शिवारात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तहसीलदार व आमदार साहेबांनी तातडीने लक्ष घालून पंचनामे सुरू करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख श्रीहरीभैय्या तळेकर ,युवासेना जिल्हा समन्वयक सागराजे तळेकर ,शहर प्रमुख सतीश खानट ,महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण यांनी दिला आहे.
